मी संजय राऊतांची रिप्लेसमेंट नाही – अमित ठाकरे

अतुल परदेशी
मुख्य संपादक
१४ ऑगस्ट २०२२


मनसेचे नेते अमित ठाकरे कालपासून तीन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात अमित ठाकरे विद्यार्थ्यांशी तसेच मनसे पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत आहेत. मात्र, अमित ठाकरे संपूर्ण दौऱ्यात माध्यमांशी बोलण्यापासून दोन हात लांबच आहेत. यावर आज पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला असता ठाकरेंनी खास ठाकरी शैलीत उत्तर दिले आहे.आज पुण्यातील पत्रकार भवन येथे त्यांनी पत्रकारांसोबत अनौपचारिक संवाद साधलाय. त्यावेळी पत्रकारांनी अमित ठाकरे यांना, तुम्ही पत्रकारांशी बोलणं का टाळता, पत्रकारांना कंटेंट का देत नाही, असा प्रश्न केला. त्यावर त्यांनी ‘ते काम करायला संजय राऊत आहेत ना’, असा टोला मारला. त्यावर पत्रकारांनी ते सध्या आतमध्ये आहेत, असा प्रश्न केला. त्यावर ‘मी कायं संजय राऊंतांची रिप्लेसमेंट आहे का?’, अशी मिश्किल प्रतिक्रिया दिली यावर एकच हशा पिकला. तर, शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर अमित ठाकरे गृहमंत्री होणार अशा आशयाच्या बातम्या आल्या होत्या त्यावर देखील अमित ठाकरे यांनी दिलखुलास प्रतिक्रिया दिली. ‘मी गृहमंत्री होणार ही अफवा होती, पण पुढचे वीस दिवस मला पत्रकार याबाबतच विचारत होते. ही बातमी खोटी आहे, हे सांगून मी थकलो होतो. म्हणून मी म्हटलं गृहमंत्री पद दिलं तर आपण विचारू करू’. असं अमित ठाकरे म्हणाले. दरम्यान, ‘मला जेव्हा विद्यार्थी सेनेचं अध्यक्ष केलं गेलं तेव्हा देखील आदल्या दिवशी समजलं होतं. त्यामुळे ही बातमी मी जेव्हा सकाळी झोपेतून उठल्यावर ऐकली तेव्हा वाटलं आता थेट शपथ घ्यायला जायचंय की काय? असा प्रश्न मला पडला होता’, अशी मिश्किल टिपण्णी अमित ठाकरे यांनी केली. मात्र, ‘मला राज ठाकरेंच्या मंत्रिमंडळात बसायला आवडेल, ते सांगतील तेच मी करेन’, असं देखील ते पुढे म्हणाले.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *