“हर घर तिरंगा अभियान”; आमदार लक्ष्मण जगताप यांनी हातात तिरंगा घेऊन आन-बान-शानने घरोघरी तिरंगा फडवण्याचे केले आवाहन

रोहित खर्गे
विभागीय संपादक
१३ ऑगस्ट २०२२

पिंपरी


देशाच्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करण्यासाठी “हर घर तिरंगा” हा विशेष अभियान राबवण्यात येत आहे. चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार लक्ष्मण जगताप यांनीही हातात तिरंगा घेऊन या अभियानात सहभाग नोंदवला. पिंपरी-चिंचवडमधील प्रत्येक नागरिकाने आन-बान-शानने घरोघरी तिरंगा फडकवून “हर घर तिरंगा” या विशेष अभियानात शंभर टक्के सहभाग नोंदवावा. स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षानंतर घरोघरी तिरंगा फडकवण्याची आपणाला ही संधी आली आहे, असे आमदार लक्ष्मण जगताप यांनी सांगितले.

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाची सांगता येत्या १५ ऑगस्ट रोजी होत आहे. या पार्श्वभूमीवर प्रत्येक भारतीयांच्या मनात स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृती तेवत राहाव्यात, देशासाठी ज्यांनी बलिदान दिले त्यांचे स्मरण व्हावे, देशाप्रती भक्तीसह कृतज्ञतेची जाणीव वृद्धिंगत व्हावी या उद्देशाने १३ ते १५ ऑगस्ट हे सात दिवस संपूर्ण भारतात “हर घर तिरंगा” हे विशेष अभियान राबवण्यात येत आहे. या अभियानाला सुरूवात झाली. पिंपरी-चिंचवडच्या विकासाचे शिल्पकार आमदार लक्ष्मण जगताप यांनीही गुरूवारी हातात तिरंगा घेऊन “हर घर तिरंगा” या विशेष अभियानात सहभाग नोंदवला.

यावेळी आमदार लक्ष्मण जगताप म्हणाले, “स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त “हर घर तिरंगा” फडकावून प्रत्येक भारतीयांपर्यंत देशभक्तीचा संदेश पोहोचवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राबवलेली ही कल्पना संपूर्ण देशाला भावलेली आहे. स्वातंत्र्य अमृतमहोत्सवाचा हा अभिमानास्पद क्षण साजरा करताना या देशातील प्रत्येक नागरिक राष्ट्र उभारणीच्या कार्यात महत्त्वाची भूमिका निभावत आहे. आपल्या तिरंग्याला भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या प्रदीर्घ संघर्षाचा इतिहास आहे. डौलाने फडकणाऱ्या तिरंग्याला आपण जेव्हा अभिमानाने पाहतो, तेव्हा नकळत स्वातंत्र्यलढ्याचा संघर्षशील आणि प्रेरणादायी इतिहास आपल्या डोळ्यासमोरुन पुढे सरकत असतो.

इंग्रजांच्या विरोधातील संघर्षात तिरंगा झेंडा हाती घेऊन भारताच्या स्वातंत्र्याचा जयजयकार करत अनेकांनी लाठ्या खाल्ल्या, कित्येकांनी तुरुंगवास पत्करला तर अनेक शुरविरांना शहीद व्हावे लागले. तुमचा जन्म गावात झाला की शहरात, तुम्ही महिला अहात की पुरुष, तुम्ही जातीव्यवस्थेच्या खालच्या पायरीवर अहात की वरच्या, तुमच्या श्रध्दा वा उपासना पध्दती भलेही वेगवेगळ्या असोत, पण या कशाचाही विचार न करता स्वतंत्र भारतात तुम्हाला तुमचे आयुष्य घडविण्याची समान संधी मिळाली आहे. या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत असताना देशातील प्रत्येक नागरिकांमध्ये राष्ट्रप्रेम जागृत राहिले पाहिजे. यासाठीच प्रत्येकाने आपल्या घरावर तिरंगा फडकवून “हर घर तिरंगा” या राष्ट्रीय महोत्सवात सामील व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.”


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *