उंचखडकचे निसर्गरम्य वातावरण, धबधबे करतायत पर्यटकांना आकर्षित

रामदास सांगळे
विभागीय संपादक,जुन्नर
०३ ऑगस्ट २०२२

उंचखडक


नैसर्गिक सौंदर्याने नटलेल्या उंचखडक (ता.जुन्नर) खबडी डोंगरदऱ्यातील लहान मोठे पावसाने खळाळून वाहत आहेत.तर निसर्गरम्य वातावरण पर्यटकांना आकर्षित करत आहे. जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागात उंचखडकचा परिसर निसर्ग सौंदर्याची अलौकिक देण आहे. गेल्या काही दिवसांपासून रिमझिम कोसळणाऱ्या पावसामुळे खबडी शिवारात भरलेल्या आनंद वन तलावासह काळभैरवनाथ मंदिर परिसरातील धबधबे शतजलधारांनी कोसळत आहेत. हे धबधबे पर्यटकांना साद घालत आहेत.

गेल्या आठवड्यात रिमझिम पावसामुळे उंचखडक (खबडी) परिसरातील धबधबे डोंगर कड्यांवरून वाहत आहेत. राजुरीपासून उत्तरेला अवघ्या तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या उंचखडक (खबडी) परिसरातील निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या डोंगरावरील धबधबा पांढऱ्या शुभ्र जलधारांनी वाहत आहे. या परिसरात काळ भैरवनाथ मंदिर, आनंदवन तलाव आदी पर्यटन स्थळ असून त्यात हरीण, काळविटाचे कळप, मोर, लांडगे, कोल्हे अन्य वन्यजीव या ठिकाणी आहेत. डोंगरांच्या दिशेने जाणारी वाट मात्र काहीशी बिकट आहे.ती पार करून हौशी पर्यटक दरवर्षी धबधब्याकडे पोहोचतात.

या पर्यटन स्थळाला भेट देण्यासाठी येणाऱ्या व्यक्तींनी पुणे-नाशिक महामार्गावरील आळेफाटा येथे आल्यानंतर कल्याण-अहमदनगर महामार्गाने अहमदनगर च्या दिशेने सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या राजुरी गावात यावे लागेल, नंतर राजुरी गावच्या उत्तरेला असलेल्या उंचखडक गावात यायचे, तेथे आल्यानंतर उत्तरेला पाहिल्यानंतर खबडी डोंगरावर निसर्ग सौंदर्य आपणास न आपणास नजरेत पडेल, त्याठिकाणी जावे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *