बैलगाडा शर्यत बंदीमुळे खिलार जातीच्या देशी वंशाच्या बैलांचे अस्तित्व धोक्यात आले असल्याने ‘बैल’ हा प्राणी संरक्षित प्राण्यांच्या यादीतून वगळावा – खासदार डॉ. अमोल कोल्हे

रोहित खर्गे, विभागीय संपादक

पुणे दि २१ जानेवारी
मुंबई उच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यतींवर घातलेली बंदीला बैलगाडा मालक संघटना व महाराष्ट्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. त्यावरील सुनावणी प्रलंबित आहे. या पार्श्वभूमीवर खासदार डॉ. कोल्हे यांनी बैलगाडा शर्यतींसाठी वापरला जाणारा बैल हा खिलार जातीचा देशी गोवंश असून त्याचा शेतीकामासाठी त्याचा वापर होत नसल्याकडे केंद्रीयमंत्री गिरीराज सिंग यांचे लक्ष वेधले आहे.

खासदार डॉ. कोल्हे यांनी आपल्या पत्रात वस्तुस्थिती नमूद करताना, केवळ शर्यतींसाठी वापरण्यात येणारा खिलार बैल सांभाळणे शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या परवडत नाही. परिणामी या बैलाची कमी दराने बेकायदा कत्तलीसाठी रवानगी केली जाते. त्यामुळे खिलार जातीच्या देशी बैलांची संख्या दिवसेंदिवस कमी होत असून भविष्यात ही देशी बैलांची जात नष्ट होण्याचा धोका व्यक्त केला आहे.

खिलार जातीच्या देशी बैलांचा वंश वाचविण्यासाठी बैलगाडा शर्यतींवरील बंदी उठणे आवश्यक आहे. त्यासाठी बैल हा प्राणी संरक्षित प्राण्यांच्या यादीतून वगळण्याची गरज आहे. त्यामुळे तातडीने अॅनिमल वेलफेअर बोर्डाची बैठक बोलावून या संदर्भात सकारात्मक निर्णय घेण्याची मागणी खासदार डॉ. कोल्हे यांनी केली आहे.