पिंपरी- चिंचवडच्या विकासाला आता पुन्हा ‘गती’

रोहित खर्गे
विभागीय संपादक
१५ जुलै २०२२

पिंपरी


पिंपरी- चिंचवड शहराच्या विकासाला चालना मिळणे गरजेचे आहे. त्यासाठी लोकोपयोगी प्रकल्प त्वरित पूर्ण करा. महापालिकेने शहरातील प्रलंबित प्रश्नांचे प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवावेत. हे प्रश्न सोडवून त्याला गती देण्यासाठी राज्य शासनाकडे पाठपुरावा करू, असा विश्वास भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी व्यक्त केला. पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त दालनामध्ये शहरातील विविध प्रलंबित विषयांवर आमदार महेश लांडगे आणि महापालिका आयुक्त राजेश पाटील यांच्यात आज मॅरेथॉन बैठक पार पडली. यावेळी त्यांच्या समवेत माजी महापौर नितीन काळजे उपस्थित होते.

आमदार महेश लांडगे- महापालिका आयुक्तांची मॅरेथॉन बैठक

आमदार महेश लांडगे व आयुक्त राजेश पाटील यांच्यामध्ये विविध विषयांवर चर्चा झाली. यामध्ये पिंपरी-चिंचवड शहराची स्वतंत्र इंटरनॅशनल मॅरेथॉन स्पर्धा राबवणे, स्पर्धेसाठी प्रायोजक नेमणूक कोण असावेत ? याची माहिती घेण्यात आली. तसेच, महापालिकेने स्पर्धेचे प्रात्यक्षिक आमदार लांडगे यांच्यापुढे सादर केले. प्रशासक काळात महानगरपालिकेने कोणते नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले, याविषयी आमदार महेश लांडगे यांच्यासमोर सादरीकरण करण्यात आले. याबरोबरच या पुढील काळात लोकोपयोगी कोणते प्रकल्प राबविण्यात येणार आहेत, याबाबत सविस्तर चर्चा झाली.

प्रलंबित प्रश्नांचे प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवण्याच्या सूचना

दरम्यान, शहरातील सोसायटीमध्ये एसटीपी धोरण काय असावे? सोसायट्यांना पूर्णत्वाचा दाखला देताना महापालिकेची काय जबाबदारी असावी? किंवा त्या कॉम्प्लिशनमध्ये लोकांचा सहभाग किती असावा? यावर चर्चा करण्यात आली. त्यानुसार पुढील कारवाई करण्यात येणार आहे. आगामी महापालिका अर्थसंकल्पात शाळा, शहरातील रुग्णालयासाठी स्वतंत्र बजेट द्या. शिवाय त्यावरील कारवाईसाठी स्वतंत्र प्रकल्प अधिकारी ‘एक्झिक्यूटिव्ह इंजिनियर’ दर्जाचा असावा अशा सूचना आमदार लांडगे यांनी दिल्या.

शहराच्या सिटी सेंटर आणि महापालिकेची नवीन इमारतीसंदर्भातदेखील चर्चा करण्यात आली. यासह भोसरी कुस्ती केंद्र- भोसरी कुस्ती केंद्रात किती विद्यार्थी असावे? खर्च किती येईल? नियोजन कसे असावे? कोणत्या माध्यमातून चालवले पाहिजे? त्याचे उद्घाटन कधी करावे? या बाबत चर्चा करण्यात आली.

सफारी पार्क, मोशी स्टेडियमचा प्रश्न मार्गी लागणार…

‘डियर सफारी पार्क’ हा प्रकल्प सुरू करणे अपेक्षित आहे. त्याबाबत पाठपुरावा केला आहे. तसेच मोशी येथील क्रिकेट स्टेडियमदेखील आगामी काळात लवकर पूर्ण होणे अपेक्षित आहे. या दोन्ही प्रकल्पांचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवा, अशा सूचना आमदार लांडगे यांनी केल्या. त्याबाबत शासनाकडे पाठपुरावा करू, असा विश्वास आमदार लांडगे यांनी दिला.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *