बंद फ्लॅटचे कुलूप तोडून ७ लाख रुपयांचे दागिने चोरट्यांनी केले लंपास

रामदास सांगळे
विभागीय संपादक
२० मे २०२२

जुन्नर


आळेफाटा : उन्हाळ्याची सुट्टी असल्याने मूळगावी गेलेल्या आळेफाटा येथील एका व्यावसायिकाच्या बंद फ्लॅटचे कुलूप तोडून चोरट्यांनी सात लाख रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केले आहेत.

या बाबत आळेफाटा पोलिसांनी दिलेली सविस्तर माहिती अशी की, आळेफाटा (जुन्नर) येथील रॉयल रेसिडेन्सी सोसायटीत गुरुवार (दि.१९) सकाळी चोरीची घटना उघडकीस आली. सदर चोरीची तक्रार संतोष शेलार यांनी दिली आहे. त्यानुसार अज्ञात व्यक्तीवर आळेफाटा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

संतोष शेलार हे मूळ अकलापूर (ता. संगमनेर, जि. अहमदनगर) येथील रहिवाशी असून, पत्नी व मुलीसोबत आळेफाटा येथील रॉयल रेसिडेन्सी सोसायटीत राहतात. १७ मे रोजी ते मूळगावी कुटुंबासोबत गेले होते.

दरम्यान, चोरट्यांनी त्यांच्या बंद फ्लॅटचे कुलूप कापून आत प्रवेश केला. बेडरूमच्या कपाटामधून २ लाख रुपये किमतीच्या पाच अंगठ्या, १ लाख रुपये किमतीची सोन्याची चैन, दीड लाख रुपये किमतीचे कानातील डूल, अडीच लाख रुपये किमतीचे दोन नेकलेस, असा एकूण सात रुपयांचा माल चोरून नेला.

दरम्यान, सोसायटीच्या रहिवाशांनी शेलार यांचे फ्लॅटचे कुलूप तुटले असल्याचे पाहिले. त्यानंतर त्यांनी शेलार यांना घरात चोरी झाल्याचे कळवले. शेलार हे गुरुवारी आपल्या कुटुंबीयांसह घरी आले असता चोरी झाली असल्याचे त्यांच्या लक्षात आले. यानंतर त्यांनी तातडीने आळेफाटा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला. पोलिसांनी तपास सुरू केला आहे. पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सुनील बडगुजर पुढील तपास करत आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *