शहरात पावसाळापूर्व कामे तातडीने पूर्ण करा – मा.महापौर माई ढोरे

रोहित खर्गे
विभागीय संपादक
११ मे २०२२

पिंपरी


शहरात पावसाळ्या पूर्वीची कामे, नदीपात्रातील जलपर्णी काढणे, कामांसाठी खोदकाम केलेले रस्ते तातडीने दुरुस्त  करण्यात यावेत यासाठी मा. महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी आयुक्त राजेश पाटील यांना निवेदन दिले आहे. ढोरे यांनी पत्रात म्हटले आहे की, पुढील जून महिन्यापासून पावसाळ्याला सुरुवात होणार आहे. त्यातच हवामान विभागाने यंदा पाऊस दहा दिवस आधीच केरळमध्ये धडकणार असल्याचा अंदाज व्यक्त केलेला आहे. त्यामुळे पावसाळ्याला लवकर सुरुवात झाल्यास पिंपरी-चिंचवडकरांची तारांबळ उडू नये म्हणून शहरात पावसाळापूर्व कामे युद्धपातळीवर होणे गरजेचे आहे. महापालिका प्रशासनाने ही बाब लक्षात घेऊन शहरातील सर्व नाल्यांची सफाई तातडीने पूर्ण करणे गरजेचे आहे. त्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना आपण तातडीने आदेश देऊन नालेसफाईची कामे लवकरात लवकर पूर्ण करावीत.

शहराच्या प्रत्येक भागात रस्त्यांची कामे सुरु आहेत. त्यासाठी अनेक भागात रस्त्यांची खोदाई करावी लागली आहे. खोदकाम केलेल्या रस्त्यांची दुरुस्ती तातडीने पूर्ण करावीत. रस्ते दुरुस्ती झाली नाही आणि पावसाळ्याला सुरुवात झाली तर संपूर्ण रस्ता चिखलमय बनतो. त्यातून मार्ग काढत जाताना एखादा वाहनचालक किंवा पादचाऱ्याच्या जिवावर बेतू शकते. त्यामुळे प्रशासनाने शहरवासीयांची आधीच काळजी घेऊन खोदलेल्या रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करावी. त्याचप्रमाणे शहरातून वाहणाऱ्या पवना, इंद्रायणी आणि मुळा नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणात जलपर्णी झाली आहे. ही जलपर्णीही तातडीने काढण्याची कार्यवाही करावी अशी विनंती माजी महापौर माई ढोरे यांनी केली आहे. यावेळी त्यांच्या समवेत मा.नगरसेविका.उषा मुंढे,आरती चोंधे, आणि पुणे विद्यापीठ सिनेट सदस्य संतोष ढोरे यांनी आयुक्त राजेश पाटील यांची भेट घेऊन पिंपरी-चिंचवड शहरातील पावसाळ्यापूर्वीची कामे,जलपर्णी काढणे,विविध कामासाठी खोदकाम केलेले रस्ते तातडीने दुरूस्त करणे ई.कामाच्या उपायोजनेबाबत माहीती घेतली.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *