मंत्रिमंडळ विस्तार: शिंदे गट आणि भाजपमध्ये 15 महिला आमदार, मग मंत्रिमंडळात एकीलाही स्थान का नाही?

अतुल परदेशी
मुख्य संपादक
१० ऑगस्ट २०२२


एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंडखोरी केली. शिंदेंसोबत सध्या एकूण 48 आमदार आहेत. यात 39 शिवसेनेचे आणि 9 अपक्ष आमदारांचा समावेश आहे. शिंदे गटातील या 48 आमदारांमध्ये तीन महिला आमदार आहेत. त्या म्हणजे यामिनी जाधव (शिंदे गट) – भायखळा मतदारसंघ (मुंबई),मंजुळा गावित (अपक्ष आमदार) – साक्री मतदारसंघ (धुळे), गीता जैन (अपक्ष आमदार) – मीरा-भाईंदर मतदारसंघ (ठाणे) मात्र, तिन्हींपैकी कुणालाही आजच्या मंत्रिमंडळ विस्तारात शिंदे गटाकडून मंत्रिपद देण्यात आलं नाहीय. दुसरीकडे, भाजपच्या एकूण 105 आमदारांमध्ये 15 महिला आमदार आहेत. यातल्या अनेक महिला आमदार या वय आणि अनुभवानेही वरिष्ठ नेतेमंडळींमध्ये मोडणाऱ्या आहेत.

भाजपमध्ये आता कोण कोण महिला आमदार आहेत, हेही आपण पाहूया :विद्या ठाकूर – गोरेगाव (मुंबई), सीमा हिरे – नाशिक पश्चिम (नाशिक), भारती लव्हेकर – वर्सोवा (मुंबई), मुक्ता टिळक – कसबा पेठ(पुणे), मंदा म्हात्रे – बेलापूर (नवी मुंबई), माधुरी मिसाळ – पर्वती (पुणे), देवयानी फरांदे – नाशिक मध्य(नाशिक), मोनिका राजळे – शेवगाव (अहमदनगर), श्वेता महाले – चिखली (बुलडाणा), नमिता मुंदडा – केज (बीड), मेघना बोर्डीकर- जिंतूर (परभणी), मनिषा चौधरी – दहिसर(मुंबई). 2014 ते 2019 या फडणवीस सरकारच्या काळात भाजपकडून पंकजा मुंडे आणि विद्या ठाकूर या मंत्रिमंडळात होत्या. मात्र, आजच्या मंत्रिमंडळ विस्तारात कुणाही महिला आमदाराला स्थान दिलेलं नाही.मंत्रिमंडळात महिलांना स्थान नसल्यानं राजकीय क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या महिलांनीही टीकास्त्र सोडलंय.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्त्री-सक्षमीकरणाबाबतच्या घोषणेचा उल्लेख करत म्हणाल्या की, “स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाच्या प्रगतीसाठी स्त्री-सक्षमीकरण आवश्यक असल्याचे सांगतात. त्यासाठी त्या केवळ ‘होम मेकर’ असू नयेत तर त्या ‘नेशन बिल्डर’ असाव्यात असं ते सांगतात. पण राज्यात मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या शपथविधीत 18 मंत्र्यांनी शपथ घेतली परंतू यात महिलांना प्रतिनिधित्व देण्यात आले नाही.””मंत्रिमंडळात महिलांना योग्य ते प्रतिनिधित्व मिळेल, अशी अपेक्षा होती परंतु एकाही महिलेला संधी मिळाली नाही. हे अतिशय खेदजनक आहे. राज्याच्या स्त्री-शक्तीवर हा अन्याय आहे,” असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *