रोहित खर्गे
विभागीय संपादक
१० फेब्रुवारी २०२२
पिंपरी
भोसरीतील सर्व सामान्य नागरीकांचा सर्वांगिण विकास करायचा हे ध्येय डोळ्यापुढे ठेवून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची २०१७ ची निवडणूक मी लढलो. मतदारांनी मला सेवा करण्याची संधी दिली. त्यावेळच्या माझ्या जाहिरनाम्यातील बहुतांश सर्व विकासकामे पुर्ण झाली आहेत. आता भोसरीचा विकास परिपुर्ण शहर म्हणून करायचा आहे असे प्रतिपादन पिंपरी चिंचवड मनपा स्थायी समितीचे अध्यक्ष ॲड. नितीन लांडगे यांनी केले.भोसरी सर्व्हे क्र. १ येथे शंभर बेडचे नविन भोसरी रुग्णालय उभारण्यात आले आहे. हे रुग्णालय गुरुवारपासून (दि. १० फेब्रुवारी) पुर्ण क्षमतेने रुग्णसेवेसाठी कार्यान्वित झाले आहे. येथील सेवा सुविधांची पाहणी करण्यासाठी ॲड. नितीन लांडगे यांनी भेट दिली. यावेळी आदी उपस्थित होते.
भोसरीतील नविन रुग्णालय रुग्णसेवेसाठी कार्यान्वित : ॲड. नितीन लांडगे
यावेळी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना ॲड. लांडगे यांनी सांगितले की, शंभर बेडच्या या नविन भोसरी रुग्णालयात अत्याधुनिक सेवा सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. यामध्ये ऑक्सिजनयुक्त ९० बेड स्त्री रोग प्रसुती विभाग व जनरल आणि १० बेड आयसीयू आहेत. तसेच तीन मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर आणि चोविस तास दोन रुग्णवाहिकेसह तातडीची सेवा उपलब्ध आहे. कोरोना कोविडचे लसीकरण आणि आरटीपीसीआरची तपासणी, आंतररुग्ण व बाह्यरुग्णांसाठी विविध तपासण्या करण्यासाठी प्रयोगशाळा, सोनोग्राफी, एक्स रे, बाह्यरुग्णांसाठी ओपीडी यामध्ये मेडीसिन, बालरोग तज्ञ, स्त्री रोग प्रसूती तज्ञ, दंतरोग तज्ञ, क्षय रोग, हिवताप विभाग आणि कुटूंब कल्याण विभाग या ठिकाणी सुरु करण्यात आले आहेत. किशोरवयीन विद्यार्थी व विद्यार्थीनींच्या समुपदेशनासाठी ‘मैत्री क्लिनिक’ यामध्ये एकात्मिक समुपदेशन आणि तपासणी केंद्र सुरु केले आहे. सकाळी ९ ते सायंकाळी ५ पर्यंत जन्म – मृत्यू नोंदणी विभाग आणि चोविस तास स्मशानभूमी दाखला देण्याची सोय करण्यात आली आहे अशीही माहिती ॲड. नितीन लांडगे यांनी दिली. तसेच भोसरी येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे पै. मारुतराव रावजी लांडगे कुस्ती प्रशिक्षण केंद्र उभारण्यात आले आहे. लवकरच त्याचा आणि संत ज्ञानेश्वर भाजी मंडईचा लोकार्पण सोहळा होणार आहे. या कुस्ती प्रशिक्षण केंद्रात पहिल्या मजल्यावर १२x१२ मीटरच्या दोन मॅट, १२०० प्रेक्षकांना बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. या केंद्राच्या शेजारी कबड्डी प्रशिक्षण केंद्राचे आणि प्रेक्षक गॅलरीचे काम आणि सिमेंटचे रस्ते करण्याचे काम वेगाने सुरु आहे. भोसरी सहल केंद्रा शेजारी आंतरराष्ट्रीय दर्जाचे मत्स्यालय, कै. अंकुशराव लांडगे सभागृहाच्या मागे एसटीपी मंजूर करण्यात आला आहे.
पुणे – नाशिक महामार्गावरील आशिर्वाद गॅस एजन्सी समोरील नाल्याचे विस्तारीकरण आणि रस्त्याचे सुशोभिकरण करण्यात आले आहे. भोसरीमध्ये इंग्रजी माध्यमाची मनपाची सुसज्ज शाळा उभारण्याचेही काम सुरु आहे. पीएमटी चौकातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्या लगत असणा-या फळ विक्रेत्यांसाठी पुणे – नाशिक महामार्गावरील उड्डाणपुलाखाली जागा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. यानंतर छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्या लगतच्या परिसराचे सुशोभिकरण करण्याचे नियोजन आहे. हे सर्व विकास प्रकल्प पुर्ण करण्यासाठी भाजपाचे शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे आणि भाजपाचे माजी शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांचे मार्गदर्शन लाभले आहे अशीही माहिती पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे स्थायी समितीचे अध्यक्ष ॲड. नितीन लांडगे यांनी माध्यम प्रतिनिधींना दिली.