व्यापारी गाळ्यांचा मिळकत कर माफ करा…..श्रीचंद आसवाणी पिंपरी मर्चंन्ट फेडरेशनची उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी…

रोहित खर्गे
विभागीय संपादक

पिंपरी- दि. ३ जून २०२१
कोरोनाच्या महामारीमुळे मार्च २०२० पासून बहुतांश काळ शहरात पुर्णता किंवा अंशता लॉकडाऊन होते. आजही ‘ब्रेक द चेन – 3’ अंतर्गत व्यापा-यांना सोमवार ते शुक्रवार दुपारी दोन पर्यंत दुकाने उघडण्यास परवानगी आहे. लॉकडाऊनमुळे मागील आर्थिक वर्षात सर्व व्यापा-यांना आर्थिक झळ बसलेली आहे. वीजबील, कामगारांचे पगार, दुकानाचे भाडे, बँकांचे कर्ज हप्ते, मुलांचा शैक्षणिक खर्च, आजारपणातील खर्च करुन सर्वच व्यापारी त्रस्त झाले आहेत. यांचा सहानुभूतीपुर्वक विचार करुन पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील सर्व व्यापारी गाळ्यांचा मागील एक वर्षाचा मिळकत कर माफ करावा, अशी मागणी पिंपरी मर्चंन्ट फेडरेशनचे अध्यक्ष श्रीचंद आसवाणी यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे.
राज्य सरकारने मागिल आर्थिक वर्षात मद्य विक्रेत्यांना परवाना शुल्क (वाईन शॉप फी) माफ केले आहे. तसेच ‘जीएसटी’ मध्येही सूट दिलेली आहे. मद्य विक्रितून ज्याप्रमाणे सरकारला मोठ्या प्रमाणात महसूल मिळतो. तसाच इतर व्यापा-यांच्या आर्थिक उलाढालीतूनही केंद्र आणि राज्य सरकारला तसेच महानगरपालिकांनाही खूप मोठ्या प्रमाणात महसूल मिळतो. मद्य विक्रेत्यांचा व्यवसाय सुरु असूनही आणि त्यांची मागणी नसतानाही सरकारने त्यांना परवाना शुल्क माफ केले आहे. इतर व्यापा-यांचा उद्योग, व्यवसाय पुर्णता: किंवा अंशता मागील एक वर्षापासून बंद आहे. या व्यापा-यांचा सरकारने तसेच मनपाचे महापौर, आयुक्त आणि इतर सर्व पदाधिका-यांनी सहानुभूतीपुर्वक विचार करावा अशीही मागणी पिंपरी चिंचवड मर्चंन्ट फेडरेशनचे अध्यक्ष श्रीचंद आसवाणी यांनी केली आहे.