समस्त शिरूरकरांनी लाडक्या माई (सिंधुताई सपकाळ) यांना वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली : माईंच्या मिळालेल्या सहवासामुळे गहिवरले शिरूरकर

रवींद्र खुडे
विभागीय संपादक
७ जानेवारी २०२२

शिरूर


अवघ्या जगाला ज्ञात असलेली, अनाथांची माय म्हणजेच पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांच्या निधनाचे वृत्त समजल्यानंतर, शिरुरकरांनी माईंच्या असंख्य आठवणी जागवित श्रध्दांजली अर्पण केली. सिंधुताई सपकाळ यांचे शिरुरकरांशी खास असे ऋणानुबंध जुळले होते. त्यांची मनःशांती ही संस्था शिरुर मधील रामलिंग रोड येथे असून, या संस्थेत माईंचे नेहमी येणे व्हायचे. या निमित्ताने शिरुर परिसरातील अनेकांशी त्यांचे ऋणानुबंध जोडलेले होते. त्यामुळेच शिरूर शहरातील विविध सामाजिक संस्था, संघटना, यांच्या वतीने शिरुर नगरपरिषद मंगल कार्यालयाजवळ, पद्मश्री दिवंगत सिंधुताई सपकाळ यांना अभिवादन  करण्यात आले. सिंधुताईच्या प्रतिमेस यावेळी पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी सिंधुताई सपकाळ यांच्या जीवन कार्याविषयी माहिती देण्यात आली.

अनाथांची माय सिंधुताई सपकाळ यांनी शहरात मनःशांती ही संस्था सुरु केली असून याठिकाणी ४८ विद्यार्थी आहेत. या खेरीज शिरुर शहर व परिसरातील विविध शैक्षणिक संस्था व सामाजिक संस्था यांच्या विविध कार्यक्रमाप्रसंगी, सिंधुताई सपकाळ यांनी उपस्थित राहून भाषणे केली होती. आपल्या भाषणातून स्वत:च्या आयुष्याचा जीवनपट उलगडत असताना आपल्याला आयुष्यात आलेल्या विविध अडचणी, निर्माण झालेले प्रश्न, जीवनातील विविध प्रसंग घटना आपल्या विशिष्ट बोलीत त्या सांगायच्या. हे भाषण अत्यंत प्रभावी असायचे. त्यांचा जीवनप्रवास ऐकताना अनेक जणांचे डोळे पाणावले जात. संकटातुन मात करुन आयुष्य कसे जगायचे, हे माई साध्या व सोप्या भाषेत सांगायच्या. जणू जीवनाचे सार त्यांच्या बोलण्यात असायचे. शिरुरला संस्थेत आल्या की माई भरुभरुन बोलायच्या आणि भविष्यातील विविध कामांविषयी सांगायच्या. माईचे आश्वासक व जिंदगीला दिशा देणारे मार्गदर्शनपर बोल जगण्याला नवी उर्जा देत असत.
असे उद्गार व अनुभव अनेकांनी श्रद्धांजली कार्यक्रमावेळी व्यक्त केले.

यावेळी माजी नगराध्यक्ष राजेंद्र क्षीरसागर, शिरुर मुद्रण संघटनेचे अध्यक्ष बाबूराव पाचंगे, बाजार समितीचे संचालक संतोष मोरे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नगरसेवक मुजफ्फर कुरेशी, नगरसेवक मंगेश खांडरे, माजी नगरसेवक सुकुमार बोरा, पत्रकार नितीन बारवकर, पत्रकार प्रा सतीश धुमाळ, पत्रकार रवींद्र खुडे, पत्रकार अनिल सोनवणे, पत्रकार संतोष शिंदे, पत्रकार पोपट पाचंगे, पत्रकार शोभा परदेशी, रमेश देशमुख, जनता दलाचे जिल्हाध्यक्ष संजय बारवकर, मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष मेहबूब सय्यद, आखिल भारतीय मराठा महासंघाच्या शशिकला काळे, माजी सरपंच वर्षा काळे, राष्ट्रवादी कॉग्रेसचे ॲड प्रदिप बारवकर, नोटरी रवींद्र खांडरे, सागर नरवडे, रावसाहेब चक्रे, अनिल बांडे, डॉ. वैशाली साखरे, ताराआक्का पठारे, शारदा भुजबळ, तुषार वेताळ, वर्धमान रूणवाल, सुशांत कुटे, राजू शेख, मनोज ओतारी, सागर सारंगधर, बंटी जोगदंड, राजू शेख यांसह विविध संस्था व संघटनांचे कार्यकर्ते उपस्थित होते.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *