MPDA अंतर्गत शिरूर पोलिसांची मोठी कारवाई : जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने शिरूरचा एकजण एका वर्षासाठी स्थानबद्ध

रवींद्र खुडे
विभागीय संपादक
९ डिसेंबर २०२१

शिरूर


शिरूर तालुक्यातील एका मोठ्या वाळूतस्कराला, ‘एमपीडीए’ कायद्यांतर्गत वर्षभरासाठी स्थानबद्ध करण्याचे आदेश जिल्हाधीकाऱ्यांनी दिल्याने, वाळूमाफीयांचे धाबे दणाणले आहेत. पांडुरंग उर्फ पांडा नारायण गरूड (रा. चव्हाणवाडी, करडे, ता. शिरूर, जि. पुणे) असे स्थानबद्ध करण्यात आलेल्या वाळूतस्कराचे नाव असून, त्याच्याविरूद्ध बेकायदा वाळू उपशाच्या गुन्ह्यांबरोबरच बेकायदा बिगरपरवाना वाळूचोरी करणे, सरकारी कामात अडथळा आणणे, सरकारी कर्मचाऱ्यांना मारहाण करणे, आदी १४ गुन्हे दाखल असून, वाळूतस्करी प्रकरणी महसूल विभागाने ११ वेळा त्याच्याविरूद्ध दंडात्मक कारवाई केलेली आहे. पांडुरंग उर्फ पांडा गरूड याच्याविरूद्ध कठोर कारवाईचा प्रस्ताव, शिरूर पोलिसांनी जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख व उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल धस यांना सादर केला होता.

पोलीस अधीक्षक व उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी या प्रस्तावाची दखल घेऊन, गरूड याला सार्वजनिक सुव्यवस्थेला बाधा ठरेल अशा प्रकारचे कृत्य करण्यापासून प्रतिबंध करण्याच्या दृष्टीने, त्याला महाराष्ट्र झोपडपट्टी दादा, हातभट्टी दादा, हातभट्टीवाले, औषधीद्रव विषयक गुन्हेगार, धोकादायक व्यक्ती, दृकश्राव्य कलाकृतींची विनापरवाना प्रदर्शन करणारे व्यक्ती (व्हिडीओ पायरट्स), वाळू तस्कर व जीवनावश्यक वस्तूंचा काळाबाजार करणाऱ्या व्यक्ती यांच्या विघातक कृत्यांना प्रतिबंधक करण्याविषयीच्या (एमपीडीए) कायद्यान्वये, एक वर्षभरासाठी स्थानबद्ध करण्याचा आदेश, पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिला असल्याची माहिती, शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांनी दिली.

कार्यवाहीचा आदेश होताच पोलिस निरीक्षक सुरेशकुमार राऊत, सहायक पोलिस निरीक्षक किरण उंदरे, पोलीस उपनिरीक्षक गणेश जगदाळे, पोलीस उपनिरीक्षक हनुमंत पडळकर, पोलीस उपनिरीक्षक सुरेश गिते, पोलीस उपनिरीक्षक अभिजीत पवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस नायक संजू जाधव, अनिल आगलावे, नाथा जगताप, नितीन सुद्रीक, संजय साळवे, विजय जंगम, आण्णा गोपाळे व प्रतिमा नवले या पोलिस पथकाने वेगवेगळ्या ठिकाणी छापे मारून, गरूड याचा शोध घेतला. तो मिळून आल्यावर त्याला ताब्यात घेऊन, त्याला स्थानबद्ध करण्याकामी गरुडची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आलीय.

“शिरूर तालुक्यातील नदीचे किनारे, ओढे व सार्वजनिक स्तोत्रांच्या ठिकाणावरून बेकायदा वाळू उपसा होत असल्यास शिरूर पोलिसांशी संपर्क साधावा. संबंधितांची नावे गोपनीय ठेवून वाळूतस्करांवर कठोर कारवाई केली जाईल. बेकायदा वाळूउपशामुळे पर्यावरणाची मोठी हानी होत असून, नैसर्गिक स्त्रोत बदलून नुकसान होत आहे. हे रोखण्यासाठी बेकायदा वाळू उपशाविरूद्धची कारवाई अधिक कठोर केली जाईल” – सुरेशकुमार राऊत, पो. नि., शिरूर पो. स्टे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *