करसंकलन विभागाच्या अनागोंदी कारभाराची उच्चस्तरीय चौकशी करण्याची माजी नगरसेवक संदीप वाघेरे यांची आयुक्तांकडे मागणी

रोहित खर्गे
विभागीय संपादक
१९ डिसेंबर २०२२

पिंपरी


पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या करसंकलन विभागामार्फत शहरामधील विविध मिळकतींची बेकायदेशीरपणे मनमानी पद्धतीने नोंदणी करून शास्तीकर व मिळकतकर आकारणीत मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार होत असल्याची तक्रार करीत महापालिकेचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान करणाऱ्या दोषी अधिकाऱ्यांवर उच्चस्तरीय चौकशी करून कठोर कारवाई करण्याची मागणी माजी नगरसेवक संदीप वाघेरे यांनी आयुक्त शेखर सिंह यांचे कडे केली आहे.

याविषयी अधिक माहिती देताना वाघेरे म्हणाले कि, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे जकात बंद झाल्यापासून उत्पनाचे साधन हे मिळकतकर,पाणी पट्टी व बांधकाम परवानगी विभागामार्फत राहिले आहे. महापालिकेच्या करसंकलन विभागामार्फत शाळेला व्यावसायिक मिळकतकर आकारणी करण्यात येत असल्याची बाब निदर्शनास आलेली असून अनेक मिळकतीना बोगस कागदपत्रांच्या आधारे करसंकलन विभागाच्या अधिकारी व कर्मचारी यांच्या संगनमताने नोंदी करून घेण्यात आलेल्या आहेत. यामध्ये तत्कालीन आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी कुलमुखत्यार पत्राच्या आधारे मिळकतींचे विभाजन, विभागणी व हस्तांतरण करू नये असा आदेश ५ ऑक्टोंबर २०१९ रोजी काढला होता.मात्र काही अधिकारी व कर्मचारी संगनमताने हे आदेश धाब्यावर ठेऊन चिखली, तळवडे व शहरातील विविध भागात अनधिकृत बांधकामाचे कुलमुखत्यार/नोटराईज्ड कागदपत्राच्या आधारे नोंदी करून महापालिकेचा कोट्यावधींचा मिळकतकर, शास्ती कर व राज्य शासनाचा मुद्नांक व नोंदणी शुल्क बुडवत आहेत. त्यामुळे महापालिकेचे व राज्य सरकारचे आतोनात नुकसान होत आहे.

सदर अधिकारी व कर्मचारी यांची अतिरिक्त आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यामार्फत खातेनिहाय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी. जर नागरिकांची फसवणूक करून अशा पद्धतीने महापालिका मिळकत कर नोंदणी करणार असाल तर शहरातील अनधिकृत बांधकाम असलेल्या अन्य नागरिकांनाही शास्तीकरामध्ये सवलत अथवा माफी देण्यात यावी, अशी आग्रही मागणी वाघेरे यांनी केली आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *