Bhosari MLA BJP city president Mahesh Landage appeals to the citizens to donate organs Bhosari MLA BJP city president Mahesh Landage appeals to the citizens to donate organs

भोसरीचे आमदार भाजप शहराध्यक्ष महेश लांडगे यांचे अवयवदान करण्याचे नागरिकांना आवाहन

रोहित खर्गे
विभागीय संपादक
१५ नोव्हेंबर २०२१

भोसरी

पिंपरी-चिंचवडमधील सूज्ञ नागरिकांनी कोरोना सारख्या महामारीवर एकोप्याने मात केली आहे. प्रत्येकाने आपआपल्या परीने या महाभयंकर संकटाच्या काळात सामाजिक बांधिलकी जपली. आता जनजीवन पूर्वपदावर येत आहे. कोरोनानंतरच्या काळातही आरोग्याच्या अनेक समस्यांना नागरिकांना तोंड द्यावे लागत आहे. सांगली-कोल्हापूरचा महापूर असो, कोरोना असो किंवा कोकणातील निसर्ग चक्रीवादळ असो…माझ्या आवाहनाला प्रतिसाद देत आपण‘एक हात मदतीचा’दिला. हा माझ्यासाठी आयुष्यभर स्मरणात राहणारा ठेवा आहे. माझ्यावर प्रेम करणारे हितचिंतक, आपुलकी दाखवणारे मार्गदर्शक, सर्वपक्षीय कार्यकर्ते- पदाधिकारी प्रत्येक वर्षी माझ्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम आयोजित करीत असतात, याचा मला अभिमान वाटतो. गतवर्षीचा वाढदिवस आम्ही दिव्यांग व्यक्तींना समर्पित केला होता.

माझे चुलते कै. बाळासाहेब नामदेव लांडगे यांचे दोन वर्षांपूर्वी अपघाती निधन झाले. त्यावेळी आम्ही लांडगे कुटुंबियांनी त्यांचे अवयवदान करण्याचा निर्णय घेतला. तसेच, जीवलग मित्र अजय शेळके यांचा चिरंजीव माझा पुतण्या कु. क्षीतीज शेळके याचे आकस्मित निधन झाले. शेळके कुटुंबियांनी त्याचे अवयवदान केले. क्षीतीजमुळे सहा लोकांना जीवदान मिळाले. त्यामुळे अवयवदान केल्यास एखाद्या गरजु रुग्णास नवे जीवन लाभू शकते, ही बाब आमच्या लक्षात आली. त्यामुळेच यावर्षी मी मानवता धर्माचे पालन करीत अवयवदान चळवळीची जागृती करण्यासाठी माझा वाढदिवस समर्पित करण्याचा निर्णय घेतला आहे. शहरात ठिकठिकाणी माझ्या वाढदिवसानिमित्त समाजपयोगी कार्यक्रम घेतले जात आहेत.

पिंपरी-चिंचवडकरांना मी आवाहन करतो की, आपण सामाजिक बांधिलकी जपत अवयवदान करुन मानवता धर्माचे पालन करावे. गरजू व्यक्तीला आपल्या मृत्यूनंतर आपले अवयव मिळाले, तर संबंधित व्यक्ती मरणाच्या दारातून परत येवू शकते. मग, अवयवदानसारखे मोठे कार्य नाही, ही बाब आपण लक्षात घेतली पाहिजे. वयाच्या ६५ वर्षांपर्यंतची कोणतीही व्यक्ती अवयवदान करू शकते. ज्या दिवशी माझा वाढदिवस आहे. (दि.२७ नोव्हेंबर) हा दिवस भारतीय राष्ट्रीय अवयवदान दिन म्हणून ओळखला जातो. या दिवशी अवयवदान करणाऱ्या दानशूर व्यक्तींचा सन्मान करण्याचा संकल्प आम्ही केला आहे. आपण जीवंतपणी अवयवदान करण्याबाबतचा फॉर्म भरु शकतो. त्यामुळे आपल्या मृत्यूनंतर जे-जे अवयव इतरांच्या जीवनांत आनंद फुलवू शकतील, त्या अवयवांचे दान करुन आपण मानवता धर्माचे पालन कराल, अशी अपेक्षा आहे. जास्तीत-जास्त नागरिकांनी अवयवदान चळवळीत सहभगी होवून अवयवदानाचे फॉर्म भरावेत, असे आवाहन करतो.

चला अवयवदान करुया,
मानवता धर्माचे पालन करुया !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *