उच्च प्रतिच्या वैद्यकीय सुविधा देण्यासाठी दानशूर व्यक्ती व संस्थांनी पुढे यावे – महापौर माई ढोरे

रोहित खर्गे
विभागीय संपादक
१८ ऑक्टोबर २०२१

पिंपरी


पिंपरी चिंचवड शहरात मागील चार वर्षात वेगाने पायाभूत सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत. त्यामुळे शहराच्या चारीबाजूंनी मोठ्या प्रमाणात गृहनिर्माण सोसायट्या निर्माण होत आहेत. वाढत्या व्यापार उदीमामुळे शहरामध्ये वेगाने लोकसंख्या वाढत आहे. त्यामुळे या नागरिकांसाठी वैद्यकीय व आरोग्य सेवा सुविधा उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे. महानगरपालिकेचे सर्व पदाधिकारी व प्रशासन यासाठी प्रयत्नशील आहेत. शहरातील नागरिकांना आणखी वेगाने आणि उच्चप्रतिच्या वैद्यकीय व आरोग्य सुविधा मिळवून देण्यासाठी सीएसआर फंडातून काही प्रकल्प सुरु करण्यात आले आहेत. आणखी काही संस्था, कंपन्या, दानशूर व्यक्ती, उद्योजक यांनी अशा प्रकल्पांना आर्थिक हातभार लावण्यासाठी पुढे यावे त्यांचे स्वागतच आहे. स्थायी समिती अध्यक्ष ॲड. नितीन लांडगे यांनी पाठपुरावा करुन ‘व्हॅक्सिनेशन ऑन व्हिल्स्‌’ या संकल्पनेतून अमेरिकन इंडियन फाऊंडेशनच्या सहकार्याने सुरु करण्यात आलेल्या ‘व्हॅक्सिनेशन ऑन व्हिल्स्‌’ या उपक्रमाचा नागरिकांना निश्चितच उपयोग होईल असे प्रतिपादन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या माई ढोरे यांनी केले.

‘व्हॅक्सिनेशन ऑन व्हिल्स्‌’ या उपक्रमाचे महापौर माई ढोरे आणि स्थायी अध्यक्ष ॲड. नितीन लांडगे यांच्या हस्ते लोकार्पण

शनिवारी (दि. १६ ऑक्टोबर) नविन भोसरी रुग्णालय येथे महापौर माई ढोरे आणि स्थायी समिती अध्यक्ष ॲड. नितीन लांडगे यांच्या हस्ते ‘व्हॅक्सिनेशन ऑन व्हिल्स्‌’ या संकल्पनेतून अमेरिकन इंडियन फाऊंडेशनच्या सहकार्याने आणि जीविका हेल्थकेअर या सहयोगी कंपनीच्या माध्यमातून सुरु करण्यात आलेल्या उपक्रमाचे उद्‌घाटन करण्यात आले. यावेळी महापौर माई ढोरे यांच्या हस्ते रुग्णवाहिकेस झेंडा दाखविण्यात आला आणि ॲड. नितीन लांडगे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून या उपक्रमाचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी नगरसेविका सारीका लांडगे, अमेरिकन इंडियन फाऊंडेशनचे प्रकल्प व्यवस्थापक डॉ. आशिष सोळंकी, जीविका कंपनीचे सीईओ जिग्नेश पटेल, डॉ. पवन साळवे, डॉ. लक्ष्मण गोफणे, डॉ. शिवाजी ढगे, डॉ. शैलजा भावसार आदींसह नविन भोसरी रुग्णालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

ॲड. नितीन लांडगे यांनी सांगितले की, जीविका हेल्थकेअर कंपनीच्या सीएसआर फंडातून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला नऊ सुसज्ज रुग्णवाहिका देण्यात आल्या आहेत. या रुग्णवाहिकांमधून आजपासून गर्दीच्या ठिकाणी म्हणजे मंडई, बस स्थानिके, रेल्वे स्टेशन, शॉपिंग मॉल, मजूर अड्डा, मोठ्या सोसायट्या, शाळा, महाविद्यालये अशा ठिकाणी जाऊन लसीकरण करण्यात येणार आहे. या प्रत्येक रुग्णवाहिकेत महापालिकेच्या वतीने एक डॉक्टर, लसटोचक (व्हॅक्सीनेटर), सहकारी, डाटाएन्ट्री ऑपरेटर, सुरक्षा रक्षक अशा पाच व्यक्तींचा गट रुग्णवाहिकेत ठिकठिकाणी जाऊन लसीकरण करणार आहे. यासाठी लागणा-या लस महानगरपालिका उपलब्ध करुन देणार आहे. ज्या व्यक्तींच्या अद्यापपर्यंत दोन लस घेऊन झाल्या नाहीत. त्यांना याचा जास्त उपयोग होईल असे ॲड. नितीन लांडगे यांनी सांगितले.स्वागत डॉ. लक्ष्मण गोफणे, सुत्रसंचालन आणि आभार डॉ. शिवाजी ढगे यांनी मानले.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *