पिंपरी चिंचवड मध्ये आय टी पार्क आणि टाटा सारखे उद्योग आणून लाखो युवकांना रोजगार दिला – शरद पवार

रोहित खर्गे
विभागीय संपादक
१७ ऑक्टोबर २०२१

काळेवाडी


ज्यावेळी जमशेदपूर वरून टाटा कंपनी हलवण्याचा निर्णय झाला तेव्हा मी सांगितले की हवी तशी हवी तेथे जमीन मी देतो कंपनी पिंपरी चिंचवड मध्ये घेऊन या. त्यानंतर टाटा कंपनी येथे आली नंतर बजाज सारख्या कंपन्या आल्या. जेव्हा माजी खासदार विदुरा नवले यांनी साखर कारखाना सुरू करण्यासाठी भूमिपूजन झाले तेव्हा मला बोलावले होते कार्यक्रम संपल्यावर मी सांगितले की येथे साखर कारखाना होऊ शकत नाही. तेव्हा मला सगळेच म्हणाले असे ? तेव्हा मी सांगितले की तुमच्या कारखान्याला दुसरीकडे जागा देतो ते त्यांनी मान्य केले. तोच कारखाना कासारसाई ला गेला. आणि ज्या ठिकाणी भूमिपूजन झाले त्या ठिकाणी आजचे आय टी पार्क उभे आहे आणि 1 ते 2 लाख युवकांच्या हाताला काम मिळाले. त्याचप्रमाणे एच ए कंपनीचे उदाहरणही दिले.

भाजपला सत्तेपासून दूर करण्याची गरज निर्माण झाली आहे.

सर्वसामान्यांच्या माथी महागाई थोपविणारे, कामगार शेतकरी विरोधी धोरणे राबविणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या हाती सत्तेची सूत्रे आहेत. देशात बेरोजगारी वाढत आहे. चुकीच्या धोरणामुळे अनेक समस्या निर्माण झाल्या असून, भाजपला सत्तेपासून दूर करण्याची गरज निर्माण झाली आहे. या बदलाची सुरुवात पिंपरी-चिंचवडपासून करा तसेच शहराचे भवितव्य ज्यांनी घडविले त्यांच्या हाती शहराचे नेतृत्त्व द्या, असे आवाहन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांनी केले.

गृहमंत्री वाळसेपाटील बोलताना म्हणाले कोणत्याही परिस्थितीत पिंपरी चिंचवड मध्ये आपली सत्ता आणायची आहे त्यासाठी सर्वांनी अंग झटकून कार्यकर्त्यांनी कामाला लागले पाहिजे त्यासाठी जे प्रस्थापित आजी माजी नगरसेवक आहेत ज्यांनी सत्तेचा उपभोग घेतला आहे. त्याचबरोबर नव्या नव्या उमेदीने पक्षासाठी ओतून झटणारे कार्यकर्ते काम करत आहे त्यांना संधी दिली द्यावी असे म्हणाले.

माजी आमदार विलास लांडे यांनी सत्ताधारी भाजपवर भ्रष्टाचाराचे आरोप केले.

खासदार डॉ अमोल कोल्हे यांनी आक्रमकतेने भाषण करत या पालिकेत अशी कोणतीही दहा विकास कामे दाखवा ज्यात एक सुद्धा भ्रष्टाचार झाला नाही. असे असेल तर मी शहरात पाऊल ठेवणार नाही. असे आव्हानच सत्ताधारी भाजपला दिले.

काळेवाडी येथील थोपटे लॉन्स येथे रविवारी (दि. १७) शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना शरद पवार बोलत होते. यावेळी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, खासदार डॉ. अमोल कोल्हे, आमदार अण्णा बनसोडे, माजी आमदार विलास लांडे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, माजी महापौर आझम पानसरे, योगेश बहल, माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, ज्येष्ठ नगरसेवक भाऊसाहेब भोईर, माजी नगरसेवक हनुमंत गावडे, जगदीश शेट्टी, अजित गव्हाणे, प्रशांत शितोळे, वैशाली काळभोर, कैलास थोपटे, मयुर कलाटे, कैलास बारणे, पंकज भालेकर, अनुराधा गोफने, सुलक्षणा धर, वर्षा जगताप, विशाल वाकडकर यांच्यासह राष्ट्रवादीच्या सर्व सेलचे आजी-माजी पदाधिकारी, आजी-माजी नगरसेवक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

भाजपकडून देशावर संकट आणण्याचे काम रोजच सुरू आहे.

शरद पवार पुढे बोलताना म्हणाले की, जगात तेलाचे दर कमी झाले तरी देशात मात्र त्याच्या उलटे चित्र पहावयास मिळत आहे. रोजच वाढणाऱ्या पेट्रोल, डिझेल आणि गॅसच्या किंमतीमुळे घराचे “बजेट’ अडचणीत आले आहे. गरीब सर्वसामान्यांचा विचार करण्याऐवजी चिमूटभर उद्योजकांच्या फायद्यासाठी निर्णय घेतले जात आहेत. शेतकरी, तरुणवर्ग, कारखानदारी अडचणीत आणण्याचे प्रकार केंद्रातील सरकारकडून घेतले जात आहेत. जाणिवपूर्वक कामगारविरोधी धोरण राबविले जात आहे. नोकरीतून “कन्फर्मेशन’ हा शब्दच वगळण्यात आल्याने कधीही कोणालाही बाहेरचा रस्ता दाखविला जात आहे. याबाबी सर्वसामान्यांच्या हितासाठी बाधा आणणाऱ्या आहेत. जे कामगार विरोधी धोरण राबवितात त्यांना सत्तेवर राहण्याचा अधिकार नसल्याचेही पवार यावेळी म्हणाले.

केंद्राच्या चुकीच्या धोरणामुळे बेरोजगारी रोजच वाढत चालली आहे. आम्ही आमच्या सत्तेचा वापर हा सर्वसामान्यांच्या, शेतकऱ्यांच्या हितासाठी केल्यामुळे जो देश 2004 साली गहू, तांदूळ, फळे आणि भाजीपाल्याची आवक करत होता तो देश 2014 साली देशातील दुसरा निर्यातदार देश बनला याचा अभिमान आहे. केंद्रातील सरकार मात्र त्याच्या उलट धोरण राबवित आहे. भाजपकडून देशावर संकट आणण्याचे काम रोजच सुरू आहे. गल्लीपासून दिल्लीपर्यंत हा प्रकार सुरू असून, पिंपरी-चिंचवड शहरातही सत्तेच्या माध्यमातून लूट सुरू आहे. भाजपाला सत्तेपासून दूर करण्याची वेळ आली आहे. देशातील या बदलाची सुरुवात पिंपरी-चिंचवडपासून होण्याची गरज आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीत भाजपला सत्तेपासून दूर करत ज्यांनी शहराचा विकास केला, भवितव्य घडविले त्यांच्या हाती नेतृत्त्व द्या, असे आवाहनही पवार यांनी यावेळी केले.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *