पालकांनो सावधान : पाल्य असाही घेऊ शकतात गैरफायदा : गणपती सजावटी साठी ड्रिल मशीन घेऊन, त्याचा वापर केला चक्क ATM मशीन फोडायला : अल्पवयीन मुलगा पोलिसांच्या ताब्यात…

बातमी : विभागीय संपादक रवींद्र खुडे
शिरूर : दि. 12/09/2021

शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस नाईक प्रताप टेंगले, हे होमगार्ड सुनिल चोरे यांच्यासह शिरूर शहरामध्ये रात्र गस्त घालत असताना, दि. ११/०९/२१ रोजी रात्रौ २.३० वा चे सुमारास, त्यांना शिरुर शहरातील नगर रोडवरील साई कॉम्प्लेक्स मधील स्टेट बँक ऑफ इंडिया चे एटीएम मध्ये, हुडी कॅप व मास्क घालून ड्रील मशीन व हातोडीच्या साहाय्याने एटीएम मशीन फोडून रक्कम चोरण्याचा प्रयत्न करत असताना, एक संशयित इसम दिसून आला. पोलिसांची चाहूल लागताच, तो इसम पळून जाण्याचा प्रयत्न करू लागला. तेव्हा पोलीस स्टाफने त्यास पाठलाग करून जागीच पकडले असता, तो अल्पवयीन विधीसंघर्षित बालक असल्याचे निदर्शनास आले. पोलिस पथकाने त्याचे पालकांना बोलावून त्यांच्या समक्ष विचारपूस केली असता, त्याने यू ट्यूब वरून एटीएम चोरी बाबतची माहिती मिळविली व वडिलांकडून गणपती सजावटीसाठी ड्रील मशीन हवी आहे असे सांगून ती मिळवुन, रात्री आईवडील घरात झोपलेले असताना, त्यांना काही कळू न देता घराबाहेर पडून, एटीएम फोडण्याचा प्रयत्न केल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी ड्रील मशीन, हातोडी इ. साहित्य जप्त केले असून, त्याचेविरूध्द, शिरूर पो. स्टे. गु. र. नं. ६८९/२१, भादविक ३७९, ५११ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलाय.

सदर प्रकाराबाबत अधिक चौकशी केली असता, वरील विधीसंघर्षित बालक हा सधन कुटुंबातील असून, त्याचे वडील एका खाजगी कंपनीमध्ये मॅनेजर पदावर नोकरीस आहेत. या मुलाने शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवून आणखी पैसे कमावण्याच्या उद्देशाने, यू ट्यूब वरून माहिती घेऊन एटीएम फोडून पैसे चोरण्याचा प्रयत्न केला आहे. त्यास मे. बाल न्यायालयात हजर करून, पुढील कारवाई शिरूर पोलीस स्टेशनचे सहायक फौजदार मांडगे हे करत आहेत.
सदरची कारवाई ही, पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अप्पर पोलिस अधीक्षक मिलिंद मोहिते व दौंड चे उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल धस, यांचे आदेशाने व पोलिस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक किरण उंदरे, पो. ना. प्रताप टेंगले, होमगार्ड सुनिल चोरे यांनी केलेली आहे.

मी याद्वारे सर्व पालकांना आवाहन करतो की त्यांनी आपल्या मुलांच्या मोबाईल फोनच्या वापराकडे जातीने लक्ष द्यावे.मुले रात्रीच्या वेळी कोठे जातात कोणाच्या संगतीत असतात त्याबाबत दक्षता घेणे व त्यांच्यावर चांगले संस्कार करणे अत्यंत आवश्यक आहे अन्यथा इंटरनेट च्या माध्यमातून नको ती माहिती मुले मोबाईल फोनवरून घेतात आणि त्याप्रमाणे अशा प्रकारचे कृत्य करतात की जे त्यांना गुन्हेगारी क्षेत्राकडे घेऊन जाऊ शकतात. त्याकरिता पालकांनी स्वत च्या निरीक्षणखाली मुलांना सोशल मिडीयाचा, इंटरनेटचा वापर करू द्यावा. जेणेकरुन अल्पवयीन मुले त्यामधून नको त्या आमिषांना बळी पडून दुष्कृत्य करणार नाहीत.
— सुरेशकुमार राऊत, पो. नि. शिरुर पोलिस स्टेशन.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *