आमच्यासारखे राष्ट्रभक्त कोणाला दहशतवादी वाटत असतील तर घटनेतील अनेक व्याख्या बदलाव्या लागतील – खासदार संजय राऊत

३१ डिसेंबर २०२२


देशात लागू असलेला मनी लाँडरिंगचा कायदा दहशतवाद्यांशी संबंध असणाऱ्या लोकांना रोखण्यासाठी निर्माण झाला आहे. आमच्यासारखे राष्ट्रभक्त कोणाला दहशतवादी वाटत असतील तर घटनेतील अनेक व्याख्या बदलाव्या लागतील, अशी खोचक प्रतिक्रिया शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.

राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांच्या मुंबईतील निवासस्थानी संजय राऊत यांनी त्यांची भेट घेतली. यावेळी देशमुख यांचे कुटुंबीय उपस्थित होते.देशमुखांच्या भेटीविषयी राऊत म्हणाले,की अनिल देशमुख ज्या संकटातून गेले, त्यातून मी सुद्धा गेलो आहे. अशावेळी आपल्या कुटुंबाची काय भावना असते, हे मला माहिती आहे.असा प्रसंग शत्रूवरही येऊ नये, अशी आमची इच्छा आहे. राज्याची सत्ता अडीच वर्षे आमच्या हातात होती. युपीएच्या काळातही आम्ही सत्ता जवळून बघितली. मात्र, आम्ही कधी आमच्या शत्रूशीही इतक्या अमानुषपणे वागलो नव्हतो. याला लोकशाही म्हणत नाही अशी नाराजी राऊत यांनी व्यक्त केली.

१०० कोटींच्या कथित वसूुलीच्या प्रकरणात जामीन मिळाल्यानेही राऊत यांनी समाधान व्यक्त केले. ते म्हणाले, या देशातील न्यायवस्थेत असे काही रामशास्री आहेत. ज्यांच्यामुळे न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे. अनिल देशमुखांना जामीन देताना न्यायालयाने गंभीर निरीक्षणे नोंदविली. माझ्या जामीनाच्या बाबतीतही सत्र न्यायालयाची निरीक्षणे गंभीर आहेत.अनिल देशमुख हे महाराष्ट्राचे गृहमंत्री होते. ३० वर्षांपेक्षा जास्त काळ ते सार्वजनिक जीवनात आहेत. त्यांची संपूर्ण कारकीर्द निष्कलंक आहे. त्यांनी अनेक मोठ्या नेत्यांबरोबर काम केले आहे. मात्र, ज्या पद्धतीने त्यांच्यावर, माझ्यावर तसेच नवाब मलिकांवर कारवाई करण्यात आली आहे, यावरून मनी लाँडरिंग कायद्याचा कशा पद्धतीने गैरवापर होतो आहे, हे दिसून येते.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *