बांगरवाडीत अज्ञात व्यक्तीने शेतकऱ्याच्या कांदा चाळीत टाकला युरिया, दोन लाख रुपयांच नुकसान…

आपला आवाज न्यूज नेटवर्क
बातमी
दि.20/8/2021

बांगरवाडीत अज्ञात व्यक्तीने शेतकऱ्याच्या कांदा चाळीत टाकला युरिया, दोन लाख रुपयांच नुकसान

बातमी:-रामदास सांगळे,विभागीय संपादक,जुन्नर

बांगरवाडी (ता.जुन्नर) गावातील दत्तात्रय बांगर यांच्या कांदा चाळीत अज्ञात इसमाने खोडसाळ वृत्तीने रासायनिक युरिया खत टाकले, त्यामुळे संपूर्ण चाळीतील निम्म्याहून अधिक कांदा खराब झाला आहे.

आधीच बाजारभाव कमी; त्यात शेतकऱ्यांचे झालेले नुकसान यामुळे शेतक-याला मनस्ताप झाला आहे. कांदा भरण्यासाठी कामगार आले असताना हा प्रकार उघडकीस आला असून; बांगर यांनी कांदा चाळीत जवळपास ३०० पिशवी कांदा साठवून ठेवला होता. त्यापैकी त्यांच्या चाळीच्या तीन कप्प्यात म्हणजे २०० पिशवी पेक्षा जास्त कांदा खराब झाला असून; त्यांचे जवळपास दोन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. याविषयी बांगर बेल्हे येथील तलाठी कार्यालयात तक्रार देण्यासाठी गेले असता; सदर कार्यालय देखील बंद होते.
दरवर्षी उन्हाळी कांद्याचे भाव सप्टेंबरनंतर वाढीव भाव मिळतील या आशेने बरेचसे शेतकरी जमेल तशा परिस्थितीत चाळीत अथवा शेडमध्ये कांदा साठवून चांगला भाव मिळण्याच्या आशेने थांबलेले असतात परंतु अशा खोडसाळपणामुळे शेतकरी नाउमेद होऊन नैराश्याकडे जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शेतकरी बांगर यांनी या प्रकरणाचा लवकरात लवकर तपास करुन गुन्हेगाराला योग्य शासन व्हावे अशी मागणी केली आहे.


असाच प्रकार बांगर यांच्या शेजारील एका शेतक-याच्या बाबतीतही घडला असून किटकनाशके फवारण्यासाठी साठवून ठेवलेल्या पाण्यात तणनाशक टाकल्याने जवळपास दोन एकर कांदा जळून गेला होता अशीही माहिती समोर येत आहे. मोठ्या कष्टाने पिकविलेल्या पिकांची अशी नासाडी करणाऱ्या विकृत लोकांमुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. या प्रकरणांत शेतकऱ्यांना योग्य तो न्याय आणि भरपाई मिळावी अशी शेतकरी वर्गातून मागणी होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *