मित्राला वाढदिवसाच्या दिवशीच यमसदनी धाडणारा नराधम, पुणे LCB ने अवघ्या 24 तासात केला जेरबंद…

बातमी : विभागीय संपादक रविंद्र खुडे
शिरूर : दि. 18/08/2021.

    शिरूर पोलीस स्टेशन गु.र नं.605/2021 भा.द.वी. कलम 302, 201, हा दिनांक 17/08/2021 रोजी दाखल झाला होता. फिर्यादी अंजली कानिफनाथ पांढरकर, वय 35 वर्षे, राहणार खंडाळे, तालुका शिरूर, जिल्हा पुणे, यांनी दिलेल्या फिर्यादिवरून, त्यांचे पती कानिफनाथ उर्फ रमेश सावता पांढरकर, वय 40 वर्षे, हे दिनांक 15/08/2021 रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास, पत्नी अंजली यांना शेतात सोडून, मोटारसायकल वरून निघून गेले होते.
     त्यानंतर फिर्यादी यांनी वारंवार त्यांच्याशी संपर्क केला असता, त्यांचा फोन सतत बंद लागत होता. त्यानंतर दिनांक 16/08/2021 रोजी खंडाळे  (ता. शिरूर, जी. पुणे) गावचे पोलीस पाटील, यांचेकडून अंजली यांना त्यांचे पती कानिफनाथ उर्फ रमेश सावता पंढरकर, हे न्हावरा – तळेगाव रोडलगत, घाटाजवळ जखमी अवस्थेत पडलेले असल्याबाबतची माहिती मिळाली. त्यामुळे अंजली यांनी समक्ष जाऊन पाहणी केली असता, त्यांचे पती रमेश यांना कोणीतरी अज्ञात इसमाने डोक्यात दगड घालून, जीवे ठार मारल्याचे दिसले होते.
     सदरचा गुन्हा हा गंभीर स्वरूपाचा असल्याने, पोलीस अधीक्षक डाॅ. अभिनव देशमुख यांनी, स्थानिक गुन्हे शाखेचे (LCB) पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांना, सदरचा गुन्हा लवकरात लवकर उघडकीस आणण्याच्या उद्देशाने सुचना करून, बारामती विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक मिलींद मोहिते, दौंड विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश धस, यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथक नेमण्यास सांगितले होते.
       त्याप्रमाणे  स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी, स.पो.नि. सचिन काळे, सहा. फौजदार तुषार पंदारे, पो.हवा. जनार्दन शेळके, पो.हवा. राजु मोमीन, पो.हवा. अजित भुजबळ, पो.ना. मंगेश थिगळे, चा.पो.हवा. मुकेश कदम यांचे तपास पथक नेमलेले होते. सदर पथकाने  कोणताही पुरावा नसताना, गोपनीय बातमीदार व तांत्रिक पुराव्यावरून, सदरचा गुन्हा हा दादाभाऊ मारुती वाघ, वय-26 वर्षे, राहणार-निमगाव दुडे, ता. शिरूर, जि. पुणे, हल्ली राहणार, हरुण पठाण यांच्या खोलीत, ढोकसांगवी, ता. शिरूर, जि. पुणे, याने त्याचे नात्यातील एका विधीसंघर्षित बालकाच्या मदतीने केला असल्याची माहिती मिळाल्याने व सदर आरोपी हा ढोकसांगवी येथे एका बिल्डिंगमध्ये लपून बसल्याची माहिती मिळाल्याने, रांजणगाव पोलीस स्टेशनचे स.पो.नि. संदीप येळे, पो.स.ई. मुंडे व स्टाफ चे मदतीने सापळा रचून, आरोपीस ताब्यात घेण्यात आले असून, सदरचा गुन्हा हा दादाभाऊ मारुती वाघ याने त्याचे नात्यातील विधी संघर्षित बालक, याचे मदतीने दारू पिताना झालेल्या भांडणाचा राग मनात धरून केल्याचे कबूल केले आहे.
     सदर आरोपीवर यापूर्वी लोणीकंद पो.स्टे. गु.र.नं. 452/16, भा.द.वि. कलम 302 प्रमाणे गुन्हा दाखल आहे.
      सदरची कारवाई ही स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट, स.पो.नि. सचिन काळे,
सहा.फौ. तुषार पंधारे, पो.हवा. जनार्दन शेळके, पो.हवा. राजू मोमीन,
पो.हवा. अजित भुजबळ, पो.ना. मंगेश थिगळे, चालक पो.हवा. मुकेश कदम व रांजणगाव पो.स्टे. चे स.पो.नि. संदीप येळे, पो.स.ई. मुंढे यांनी केली आहे.
    खुनाचा गुन्हा तात्काळ उघड करून आरोपींना ताब्यात घेतल्याने, पोलीस अधीक्षक व पुणे पोलिसांचे कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *