एसएससी बोर्डा’ च्या गलथान कारभाराविरोधात ‘भाजपा’चा आंदोलनाचा इशारा – भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांची आक्रमक भूमिका

– प्रवेश प्रक्रिया थंडावल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य संकटात येण्याची भिती

रोहित खर्गे
विभागीय संपादक

पिंपरी- दि २६ जुलै २०२१
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्या (एसएससी बोर्ड) वतीने इयत्ता अकरावी प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या सीईटी परीक्षेची नावनोंदणी करण्यासाठी मंडळाने निर्माण केलेले संकेतस्थळ विद्यार्थ्यांच्या सहनशीलतेचीच कसोटी पाहणारे ठरले असून ते तातडीने कार्यान्वित न केल्यास तीव्र आंदोलन उभारले जाईल, असा इशारा भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी दिला आहे.
मंडळाच्या कारभाराप्रमाणेच मंडळाचे संकेतस्थळही बिघडले असून त्यामुळे विद्यार्थी व पालकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागल असल्याचा आरोपही त्यांनी केला.
आमदार महेश लांडगे म्हणाले की, ‘दहावीच्या परीक्षेच्या निकालावेळी सर्व्हर क्रॅश झाला होता. त्यामुळे सुमारे १५ लाख ७५ हजार विद्यार्थ्यांना निकाल समजायला चार ते आठ तास विलंब झाला. त्यामुळे विद्यार्थी आणि त्यांच्या कुटुंबियांची घोर निराशा झाली व त्यांच्या आनंदावर विरजण पडले. आता अकरावी परीक्षेसाठी घेण्यात येणाऱ्या सीईटी प्रवेश परीक्षेची नावनोंदणी करण्यासाठी तयार करण्यात आलेले संकेतस्थळ गेल्या आठवड्यापासून बंद आहे. तांत्रिक बिघाडाचे कारण सांगितले जात असले, तरी मंडळाचा गलथानपणाच यास कारणीभूत असून हा बिघाड दूर करण्यात होणाऱ्या दिरंगाईमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्यच धोक्यात आले आहे. बारावीच्या विद्यार्थ्यांच्या अंतर्गत मूल्यमापन गुणांचा सर्व्हरही ठप्प झाल्याने निकालाला विलंब होण्याची भीती निर्माण झाली आहे. यामुळे विद्यार्थी आणि पालकांना होणाऱ्या मनस्तापाची जबाबदारी मंडळाचीच आहे, असे ते म्हणाले.

बोर्डाच्या अकार्यक्षम, बेजबाबदार आणि गलथान कारभारामुळे लाखो विद्यार्थी आणि पालकांची चिंता वाढली आहे. यावर गांभीर्याने विचार करून मंडळाने तांत्रिक बाबींची तातडीने पूर्तता करावी आणि संकेतस्थळ विद्यार्थ्यांना विनासायास उपलब्ध करून द्यावे, तसेच नोंदणीची मुदत वाढवावी, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा आमदार लांडगे यांनी दिला आहे.

मायबोली मराठी अन् राष्ट्रभाषा हिंदीची गळचेपी होणार…
सीईटी परीक्षेसाठी निश्चित केलेल्या विषयांमध्ये इंग्रजी, गणित, सामान्य विज्ञान आणि विज्ञान हे विषय आहेत. परंतु महाराष्ट्रात मराठी आणि हिंदी भाषा विषयांचा समावेश नाही. यामुळे मायबोली मराठीची आणि राष्ट्रभाषा हिंदीची गळचेपी होणार आहे. शिवाय या माध्यमांतून शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांवर अन्याय होणार आहे. एरवी मराठीचा पुळका आणणाऱ्या महाविकास आघाडी सरकार प्रत्यक्षात मात्र मराठीची गळचेपी करीत आहे. सीईटी परीक्षेत इंग्रजी सोबत मराठी आणि हिंदी भाषांचा वैकल्पिक भाषा विषय म्हणून तातडीने समावेश करण्यात यावा, अशी भाजपाची मागणी आहे, असेही आमदार महेश लांडगे यांनी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *