घोडेगाव एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत मंजूर कामांना निधी तसेच प्रलंबित योजना तात्काळ राबविण्याच्या गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिल्या सूचना… मंत्रालयात आढावा बैठक पार

आंबेगाव : –
ब्युरोचिफ, मोसीन काठेवाडी

घोडेगांव येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत आदिवासी विकास महामंडळाच्या विविध योजनांच्या अंमलबजावणी संबंधी, राज्याचे  गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि आदिवासी विकास मंत्री के. सी. पाडवी यांच्या उपस्थितीत आज मंत्रालयात आढावा बैठक पार पडली. घोडेगांव प्रकल्पांतर्गत येणाऱ्या आदिवासी भागात मोठ्या प्रमाणात हिरड्याचे उत्पादन घेतले जाते. हिरड्याला आधारभूत किंमत मिळण्यासाठी आदिवासी विभागाने धोरणात्मक निर्णय घ्यावा, अशा सूचना गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिल्या. तसेच प्रकल्प कार्यालय घोडेगांव येथील प्रकल्प अधिकारी आणि इतर रिक्त जागा लवकरात लवकर भरण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. या बैठकीला आ. अतुल बेनके, आ. सुनील शेळके आणि संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.


हिरडा खरेदी, खावटी वाटप, शबरी आवास योजना, घोडेगांव येथील इंग्रजी माध्यमाच्या शाळेसाठी शिक्षक नियुक्ती, कोरोनाकाळात आदिवासी विद्यार्थ्यांची ऑनलाईन / ऑफलाईन शिक्षणाची व्यवस्था करणे, पडकई योजनेसाठी निधीची उपलब्धता करून देणे, आश्रमशाळांमधील रिक्त जागा भरणे, आदिवासी भागासाठी खास बाब म्हणून रॉकेल पुरवठा करणे आणि आदिवासी पर्यटनाला चालना देणे, अशा अनेक विषयांवर या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली.

घोडेगांव येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत मंजूर झालेल्या कामांना निधी पुरवणे तसेच प्रलंबित योजना तात्काळ राबविण्याच्या सूचना गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी प्रशासनाला दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *