खेड सेझ १५ टक्के परताव्याचा प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडवा, खा. डॉ. अमोल कोल्हेंची उद्योगमंत्र्यांकडे मागणी…

बातमी प्रतिनिधी : अक्षता कान्हूरकर, राजगुरूनगर

राजगुरूनगर :

खेड मधील सेझ प्रकल्पातील १५ टक्के परताव्याचा प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडवा, अशी मागणी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, खेड आणि शिरूर तालुक्यातील कनेरसर, निमगाव दावडी, केंदुर, गोसासी या गावांची १२५० हेक्टर जमीन सेझ प्रकल्पासाठी संपादित करण्यात आली होती. जमीन संपादन करताना हेक्टरी १७ लाख ५० हजार एवढा मोबदला देण्यात आला होता. मोबदला देताना २५% रक्कम पंधरा टक्के परतावा विकसित प्लॉटच्या स्वरूपात देण्यासाठी विकसन मूल्य म्हणून कपात करण्यात आले होते.
               त्यानंतर या कपात रकमेचे शेअर्स मध्ये रूपांतर करून खेड डेव्हलपर्स लिमिटेड कंपनी स्थापन करण्यात आली. गेले १२ वर्षापेक्षा अधिक कालावधी होऊनही या कंपनीचे कामकाज फक्त कागदोपत्री असल्याने व शेतकऱ्यांना कुठल्याही पद्धतीने विश्वासात घेतली जात नसल्याने ‌के. डी. एल. कंपनीच नको अशी शेतकऱ्यांनी भूमिका घेतली. शेतकऱ्यांनी याबाबत लेखी निवेदने राष्ट्रपती, राज्यपाल, उद्योग मंत्री, मुख्यमंत्री, एमआयडीसी सी.ई.ओ आणि जिल्हाधिकारी यांना वारंवार दिली, अशी माहिती सेझ प्रकल्पबाधित शेतकरी सचिन भालेकर, प्रा. डॉ. बाळासाहेब माशेरे, संतोष ताम्हाणे, भानुदास नेटके, विश्वास कदम, शिवाजी भांबूरे, संतोष दौंडकर, सुरेश थोरात, काशिनाथ हजारे आदींनी दिली.


                डॉ. अमोल कोल्हे यांनी खेड डेव्हलपर्स लिमिटेड कंपनीकडे असलेला भूखंड एमआयडीसीकडे देऊन शेतकऱ्यांना १५ टक्के परतावा करण्याची मागणी केली आहे. तसेच गरज भासल्यास शेतकरी प्रतिनिधी, स्थानिक आमदार व के. आय. पी. एल. कंपनीसह सर्व प्रतिनिधींंची बैठक लावून तातडीने प्रश्न सोडविण्याची मागणी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *