अटकेत असणाऱ्या पै. मंगलदास बांदल यांच्या आणखी तीन साथीदारांना अटक…

बातमी : विभागीय संपादक रवींद्र खुडे
शिक्रापूर : दि. 29/06/2021.

पुणे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माजी प्रदेश उपाध्यक्ष, तसेच शिक्रापूर ग्राम पंचायतचे माजी सरपंच पै. मंगलदास बांदल, हे शिवाजीराव भोसले सहकारी बँकेच्या फसवणूक प्रकरणात काही दिवसांपासून पुणे पोलिसांच्या अटकेत आहेत. त्यांच्या या गैरव्यवहारात, त्यांना साथ देणाऱ्या आणखी तीन जणांना आता शिक्रापूर पोलिसांनी अटक केली आहे. यामध्ये वाफगाव (ता. खेड) येथील माजी सरपंचाचाही समावेश आहे, अशी माहिती शिक्रापूर पोलिसांनी दिली.

या प्रकरणात बांदलांसह आणखी दोघे आधीच कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहेत.
याच प्रकरणी आता

1) संजय शिवाजीराव शितोळे – सरकार (रा. पिंपळे जगताप, ता. शिरूर, जी. पुणे),
2) विकास नामदेव कराळे (रा. वाफगाव, ता. खेड, जी. पुणे) आणि
3) गोविंद शंकर झगडे (रा. धानोरे, ता. शिरूर, जी. पुणे)
यांना शिक्रापूर पोलिसांनी सोमवार दि. 28 जून रोजी अटक केली आहे.

   या सर्वांनी शिक्रापूर येथील दत्तात्रय मांढरे, यांची खोट्या दस्तऐवजाद्वारे आर्थिक फसवणूक करून, बनावट कुलमुखत्यारपत्र बनविल्याचे पुढे आले होते. या प्रकरणात आता नव्याने तीन आरोपींचा सहभाग असल्याचे निष्पन्न झालेय. बनावट कागदपत्रांद्वारे मूळ १ कोटी २५ लाखांच्या कर्जाचे हप्ते न भरल्याने, वाढलेल्या २ कोटी ५० लाख रुपये रकमेच्या थकबाकीवरून, दत्तात्रय मांढरे यांनी तक्रार दाखल केलेली होती. 
  आधीचे अटक तीन आरोपी व आता नव्याने अटक केलेले तीन आरोपी, अशी या प्रकरणातील एकूण आरोपींची संख्या आता सहावर जाऊन पोचलेली आहे. त्यामुळे, बांदल यांच्या अडचणींत आणखी वाढ होताना दिसत आहे.

याबाबत पुढील तपास शिक्रापूर पोलिस करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *