खुद्द तहसीलदारांनाच खंडणी मागणाऱ्या समाजसेवकास पारनेरच्या पोलिसांकडून अटक…

बातमी : विभागीय संपादक रवींद्र खुडे, शिरूर.
पारनेर : दि. 23/06/2021.

पारनेर तालुक्यातील धोत्रे येथील समजसेवक अरुण रोडे याला पारनेर पोलिसांनी खंडणी घेताना रंगेहात पकडून अटक केली आहे. पारनेरच्या तहसीलदार श्रीमती ज्योती देवरे यांनी याबाबत पोलिसांना सांगितले होते, त्यानुसार रोडे याने तहसीलदारांकडून तीस हजार रुपयांची रक्कम स्वीकारताना, पारनेर पोलीसांनी रंगेहात पकडले. पोलिसांनी अटक करत असतानाही, तहसीलदार यांच्या दालनात रोडे हा तहसीलदारांना दमदाटी करत असतानाचे व्हिडिओ चित्रीकरण, तहसीलदारांकडे आहे. याबाबतची तक्रार खुद्द तहसीलदार यांनी पोलिसांना दिली आहे. या तक्रारीनुसार, अन्याय निर्मूलन समिती या संघटनेचा जिल्हाध्यक्ष अरुण रोडे हा, पारनेर तालुक्यातील नदीपात्रातील व इतर ठिकाणच्या वाळू उपशासंबंधी व तहसील कार्यालयासंबंधीच्या बातम्या प्रसार माध्यमांमधून प्रसिद्ध झालेल्या, तहसीलदार यांना रात्री उशिरा पाठवीत असे. तसेच त्यांच्या कार्यक्षमतेवर टीका करत त्रास देऊन पैशांची मागणी करत असे. दि. 14 जून 2021 रोजी महसूल विभागाने एक वाळूचा ट्रक पकडला होता.


रोडे याच्या हितसंबंधीत व्यक्तीचा तो ट्रक असल्याने त्याने तहसीलदार यांना तो ट्रक सोडण्याचे सांगितले. ट्रक जर सोडला नाही तर तुमच्याविरोधात अनेक तक्रारी आहेत, त्या मी वरिष्ठांना सांगितल्या असून महसूलमंत्र्यांनाही सांगेन. जर हे प्रकरण येथेच थांबवायचे असेल, तर मला दरमहा पन्नास हजार रुपये दयावे लागतील असे धमकावले. परंतु या धमकीला तहसीलदार यांनी न घाबरता रोडे याला सांगितले की,
“मी या सर्वांची योग्य उत्तरे व स्पष्टीकरण वरिष्ठांना व मंत्री महोदयांना देईल, कारण मी सरळ व कायदेशीर मार्गाने काम करतेय” असे तहसीलदार यांनी आपल्या तक्रारीत म्हटलेले आहे.

Advertise
  एवढे झाल्यानंतरही रोडे याने तहसीलदारांना रात्री अपरात्री मोबाइलवर असे मेसेज टाकणे व पैशांची मागणी चालूच ठेवल्याने, तहसीलदारांनी पारनेरचे पोलीस निरीक्षक घनश्याम बळप यांना याबाबत तक्रार केली. त्यानुसार, खुद्द तहसीलदार यांच्याकडूनच पैसे स्वीकारून ते तहसीलदारांच्या दालनाबाहेरच मोजत असताना, पारनेरचे पोलीस निरीक्षक घनश्याम बळप, पोलीस उप निरीक्षक हनुमान उगले, पोलीस कर्मचारी भालचंद्र दिवटे, गहिनीनाथ यादव आदींनी रोडेला रंगेहात पकडलेय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *