मी व माझी पत्नी डॉ. सौ पल्लवी राऊत 1992 पासून नारायणगाव येथे वैद्यकीय सेवा देत आहोत. उच्च वैद्यकीय शिक्षण ( एम.डी. मेडीसिन ) आणि के. ई. एम. व जहांगीर रुग्णालयातील अनुभव , वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवरांचे मार्गदर्शन व आशीर्वाद घेवून सेवेला प्रारंभ केला. सुरवातीला जुन्नर तालुक्यातील रुग्ण यायचे. आता पुणे , अहमदनगर, ठाणे जिल्ह्यातील एकूण 12 तालुक्यातील रुग्णांची सेवा करण्याचे भाग्य मिळत आहे. हृदयविकार ,अपघात,विषबाधा,सर्पदंश झालेल्या हजारो रुग्णांना जीवदान मिळाले. विशेषत: सर्पदंश झालेल्या 5000 पेक्षा जास्त रुग्णांना जीवदान मिळाले. ग्रामीण रुग्णालय मंचर येथे ऑन. कन्सल्टंट म्हणून मोफत सेवा देत आहे.
ग्रामीण भागातील माझ्या वैद्यकीय सेवेला 30 वर्षे पूर्ण झाली. आम्हांला सर्वसामान्य गरीब रुग्ण व त्यांचे नातेवाईक यांनी भरभरून प्रेम व आशीर्वाद दिले. आदिवासी वाडी/ वस्ती पासून ते ऑक्सफर्ड विद्यापीठ लंडन येथे जाऊन व्याख्याने देण्याचा योग आला .
नुकतीच जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) आमच्या सर्पदंश कार्याची दखल घेऊन माझा “सर्पदंश व्यवस्थापन” तज्ज्ञांच्या यादीत (Roster of Expert for Snake Bite Envenoming) समावेश केला. आमच्या या क्षेत्रातील अनुभवाचा उपयोग आपल्या देशाला व जगाला होण्याची संधी यामुळे उपलब्ध झाली आहे.शून्य सर्पदंश मृत्यूदर प्रकल्प हे मोठे आव्हान आम्ही स्वीकारले असून त्यास आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळत आहे.
आमच्या रुग्णसेवा प्रवासाचे श्रेय माझे आई-वडील व कुटुंब, माझे प्राथमिक शाळेपासून ते वैद्यकीय शिक्षणा पर्यंतचे गुरुजन, आम्हांला मुलाप्रमाणे माननारे डॉ. पद्मभूषण डॉ. जाल व सौ. मेहरू मेहता, सहकारी डॉक्टर्स,लायन्स क्लब ऑफ शिवनेरी, सेवेची संधी देणारे माझे सर्व रूग्ण, हॉस्पिटलचे सर्व कर्मचारी, लोकप्रतिनिधी, मित्र परिवार, प्रसारमाध्यमे आणि जनतेस जाते. आपण सर्वांनी वेळोवेळी पाठीवर मारलेली ही कौतुकाची थाप आमच्या पुढील कार्यासाठी निश्चितच बळ व ऊर्जा देईल. आपणा सर्वांचे ऋण व्यक्त करण्यासाठी शब्द अपुरे असून; आम्ही सदैव आपल्या ऋणात राहू.
डॉ. सदानंद द राऊत
डॉ. सौ पल्लवी सदानंद राऊत
डॉ. संदेश सदानंद राऊत