सरकार व्हेंटिलेटरवर, फेब्रुवारी महिना पाहणार नाही, संजय राऊत यांचा पुनरुच्चार

दि. ०७/०१/२०२३
पिंपरी


पिंपरी : शिंदे सरकार सध्या व्हेंटिलेटरवर आहे. सुप्रीम कोर्टाने हे व्हेंटिलेटर काढलं की सरकारचं राम नाम सत्य है… त्यामुळे हे सरकार फेब्रुवारी महिना पाहणार नाही, हे वक्तव्य मी करतोय, त्यावर अजूनही ठाम आहे, असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलंय.

राऊत सध्या नाशिक दौऱ्यावर आहेत. तेथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी शिंदे सरकारवर टीका केली.संजय राऊत म्हणाले, ‘ शिवसेनेच्या 16 आमदारांविरोधात अपात्रतेचा खटला कोर्टात सुरु आहे. न्यायव्यवस्थेतवर कोणताही दबाव आला नाही तर निकाल आमच्या बाजूने लागणार. आणि न्यायालयात आम्हाला न्याय मिळणार, हे निश्चित आहे… त्यामुळे हे सरकार फार काळ टिकाणार नाही, हे मी ठामपणे सांगू शकतो, असा दावा राऊतांनी केलाय.

शिवसेना आमदारांवरील अपात्रतेची कारवाई आणि विधानसभा अध्यक्षांच्या अधिकार कक्षांचा उहापोह करणाऱ्या याचिकेवरील सुनावणी येत्या 10 जानेवारी रोजी आहे. या सुनावणीकडे राज्याचच नव्हे तर अवघ्या देशाचं लक्ष लागलंय. अपात्र आमदारांच्या यादीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह महत्त्वाच्या नेत्यांची नावं आहेत. त्यामुळे खरच सरकार पडणार की नाही, या चर्चांना ऊत आलाय.

संजय राऊत नाशिकमध्ये बोलताना म्हणाले, ‘ अधिवेशनात मुख्यमंत्र्यांसह सहा मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराची प्रकरणं आली तरी सरकार ठोंब्याप्रमाणे बसून होतं. सरकारमध्ये दोन गट आहेत. तुमचं तुम्ही बघा, आमचं आम्ही बघा सुरू आहे.. तुमचं तुम्ही बघावाल्यांचं सरकार 40 आमदारांच्या पलिकडे नाही. 40 आमदारांची ख्याली खुशाली पाहण्यासाठी सुरू आहे…राज्यात 2024ची तयारी सुरू आहे. त्याआधीच परिवर्तन होईल. हे सरकार फेब्रुवारी महिना पाहणार नाही. माझं मत पक्कं आहे. आमच्या न्यायव्यवस्थेवर दबाव येईल असं वाटत नाही. संविधान घटना आणि कायद्याचं उल्लंघन करणारं सरकार फेब्रुवारीचा महिना पाहणार नाही…6 आमदार अपात्र ठरतील. त्यामुळे वेळकाढू धोरण सुरू आहे. सरकार व्हेंटिलेटरवर आहे. ते काढलं सर्वोच्च न्यायालयाने तर हे राम सुरू होईल. कोणी त्यांच्याबरोबर राहणार नाही, असं वक्तव्य राऊत यांनी केलंय.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *