मोशीतील प्रिस्टीन ग्रीन सोसायटीतील पार्किंगचा प्रश्न निकालात – भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांच्याहस्ते भूमिपूजन…

रोहित खर्गे
विभागीय संपादक

पिंपरी- दि १८ जून २०२१
मोशी येथील प्रिस्टीन ग्रीन सोसायटीच्या पार्किंगचा प्रश्न अखेर निकालात निघाला आहे. भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांच्या पुढाकाराने पार्किंगच्या कामाचे भूमिपूजन शुक्रवारी करण्यात आले.
यावेळी माजी महापौर राहुल जाधव, नगरसेवक वसंत बोराटे, नितीन बोऱ्हाडे, संतोश बारणे, चिखली- मोशी- चऱ्होली हाउसिंग सोसायटी फेडरेशनचे अध्यक्ष संजीवन सांगळे, सोसायटी मेंबर संजय गोरड आदी उपस्थित होते.
मोशी येथील प्रिस्टीन ग्रीन सोसायटीच्या पार्किंगचा प्रश्न गेल्या दीड वर्षांपासून प्रलंबित होता. त्याबाबत नागरिकांनी आमदार महेश लांडगे यांच्याकडे आपले गाऱ्हाणे मांडले होते. यावर आमदार लांडगे यांनी मध्यस्थी करत हा प्रश्न निकाली काढला आहे. संबंधित बिल्डरला आमदार लांडगे यांनी कोणाचेही नुकसान न होता प्रश्न सोडविण्याची सुचना दिली होती. त्यानुसार प्रत्येक सदनिका धारकांना पार्किंगची सुविधा देण्याचे बिल्डरकडून मान्य करण्यात आले. अखेर पार्किंच्या कामाला आता सुरूवात झाली आहे.


रहिवाशांनी व्यक्त केले समाधान…
मोशी येथील प्रिस्टीन ग्रीनच्या ४ इमारती बांधून पूर्ण झाल्या आहेत. तर उर्वरित इमारतींचे काम चालूच आहे. या ठिकाणी ३८८ सदनिकाधारक आहेत. या सदनिकाधारकांच्या पार्किंगचा प्रश्न निर्माण झाला होता. नियमानुसार सदनिकाधारकांना पार्किंगची सोय करायची असते. मात्र प्रिस्टीन ग्रीन मधील सुमारे १९० सदनिकाधारकानांच पार्किंगची सुविधा दिली होती. या मधेही दुचाकी, सायकल पार्किंगची सुविधा नव्हती. त्याबाबत सोसायटी सभासद वारंवार पाठपुरावा करत होते. मात्र त्यांची दखल घेतली जात नव्हती. आमदार लांडगे यांच्या पुढाकाराने पार्किंगचा प्रश्न मार्गी लागला आहे. त्यामुळे सोसायटी सभासदांनी समाधान व्यक्त केले आहे.

Advertise


प्रतिक्रिया
पार्किंग मिळावे यासाठी दीड वर्ष आम्ही यासाठी पाठपुरावा करत होतो. विषय जटील होऊन बसला होता. महापालिकेकडेही आम्ही पाठपुरावा केला. मात्र हा प्रश्न सुटला नव्हता. नियमानुसार पार्किंग देण्याची सोय असतानाही आम्हाला दिले नाही. दुचाकी व सायकलचीही सुविधा नव्हती. त्याबाबत आमदार महेश लांडगे यांच्याकडे आम्ही प्रश्न मांडले. त्यांनी त्वरित हा प्रश्न सोडविला आहे. आता पार्किंगच्या कामाचे भूमिपूजनही करण्यात आले आहे.

  • संजय गोरड, प्रिस्टीन ग्रीन्स सोसायटी सदस्य.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *