ग्रामीण भागातील कोविड केअर सेंटरसाठी कुशल मनुष्यबळ द्या – खा. डॉ.अमोल कोल्हे यांची कोविड आढावा बैठकीत मागणी

पुणे,दि.१६ प्रतिनिधी
शिरुर लोकसभा मतदारसंघातील ग्रामीण भागात उभारलेल्या चांडोली व शिरोली कोविड आरोग्य केंद्रांना तातडीने कुशल मनुष्यबळ उपलब्ध करुन द्यावे. त्याचबरोबर हडपसर व म्हाळुंगे (ता. खेड) येथे जंबो कोविड केअर सुरु करता येईल का? याची चाचपणी करावी, अशी मागणी शिरुर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ.अमोल कोल्हे यांनी केली.

रोहित खर्गे
विभागीय संपादक

पुणे :- दि १७ एप्रिल २०२१
विधानभवन पुणे येथे राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली कोविड आढावा बैठक संपन्न झाली. यावेळी पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, पिंपरी चिंचवडच्या महापौर उषा उर्फ माई ढोरे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे, खासदार श्रीरंग बारणे, आमदार चंद्रकांत पाटील, आमदार अॅड. अशोक पवार, आमदार दिलीप मोहिते पाटील, 👌आमदार अतुल बेनके, आमदार सुनील शेळके, विभागीय आयुक्त सौरभ राव, पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रमकुमार, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त राजेश पाटील, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्यासह अन्य लोकप्रतिनिधी व अधिकारी उपस्थित होते.

या बैठकीत खा.कोल्हे म्हणाले, शिरूर लोकसभा मतदारसंघातील चांडोली कोविड सेंटरमध्ये ३ व्हेंटिलेटर चालविण्यासाठी तांत्रिक मनुष्यबळ उपलब्ध करून द्यावे. तसेच शिरोली येथील कोविड केअर सेंटरसाठी १ फिजिशियन, १ एक्स रे, १ ईसीजी मशिन, २ टेक्निशियन अशा कुशल मनुष्यबळाची गरज आहे. त्याठिकाणी लवकरात लवकर मनुष्यबळ दिले तर हे कोविड सेंटर नागरिकांसाठी तातडीने सुरू करता येईल. या सोबत म्हाळुंगे व हडपसर येथे देखील जम्बो कोविड सेंटर सुरू करण्याबाबत चाचपणी करावी, अशी मागणी त्यांनी केली.

पुणे जिल्ह्यासाठी कोविड टास्क फोर्सचे तज्ज्ञ डॉक्टर वेबिनार घेण्यासाठी तयार आहेत. खासगी आणि सरकारी हॉस्पिटलच्या डॉक्टरांचे कोविड उपचारासंदर्भात आणखी ज्ञान वाढविण्यासाठी याचा नक्की फायदा होईल. सध्या जम्बो कोविड सेंटरमध्ये पेशंटला दाखल होण्यासाठी आरटीपीसीआर टेस्टची अट बंधनकारक केली आहे. या टेस्टचा रिपोर्ट मिळायला वेळ लागतो. त्यामुळे अॅडमिट करून घेण्यासाठी आरटीपीसीआर टेस्ट ऐवजी जर रॅट पॉझिटीव्ह रिपोर्ट पाहावा. जेणेकरून पेशंटला आरटीपीसीआर साठी धावपळ करावी लागणार नाही. कारण रॅट पॉझिटीव्ह असेल तर आरटीपीसीआर टेस्ट सुद्धा पॉझिटीव्ह येतेच. त्यामुळे रॅट पॉझिटीव्ह हाच निकष केला तर नागरिकांची धावपळ थांबून लवकर प्रवेश मिळण्यासाठी फायदा होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

तसेच रेमडिसीवीर इंजेक्शनसाठी अनेक प्रायव्हेट हॉस्पिटलनी पेशंट दाखल करून घ्यायला सुरूवात केली आहे. यामध्ये जे कोविड हॉस्पिटल नाहीत, तसेच महापालिका किंवा जिल्हा परिषदेकडे नोंदणी न केलेल्या हॉस्पिटल्सने देखील पेशंट दाखल करून घ्यायला सुरूवात केली आहे. त्यांच्या रेमडिसीवीरच्या मागणीसाठी स्वतंत्र नवी यंत्रणा तयार करावी लागेल. कारण ते हॉस्पिटल पेशंटच्या नातेवाईकांना ४ ते ५ रेमडेसिवीर इंजेक्शन आणण्यास सांगितल्यामुळे त्यांची दमछाक होत असल्याचे चित्र आहे.

गतवर्षीच्या डॅशबोर्ड अपडेटेशन अप्रतिम होतं. परंतु त्या तुलनेत यावर्षी मात्र डॅशबोर्ड अपडेट होताना दिसत नाही. डॅशबोर्ड टीमकडून हॉस्पिटल्ससोबत संपर्कच होत नसल्याचे दिसत नाही. कारण त्यावर फक्त बेड उपलब्ध आहे की नाही याची माहिती दिसते. त्यांची यादी पाहीली तर अनेक हॉस्पिटलचे फोन नंबरच चालू नाहीत. पेशंट गेल्यानंतर बेड उपलब्ध नाही अशी माहिती समजते. त्यामुळे ती यंत्रणा देखील सुधारणे अत्यावश्यक आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

रेमडिसिवीर पेक्षा ऑक्सिजन पुरवठ्यावर लक्ष केंद्रित करावे. प्लाझ्मासाठी नागरिकांची धावपळ होत आहे. लोकप्रतिनिधींना या संदर्भात नागरिकांचे अनेक फोन येतात. काही दिवसांपुर्वी राज्य सरकारने प्लाझ्मा थेरेपीची ट्रायल बंद केली आहे. विविध संशोधनात असं लक्षात आले आहे की प्लाझ्माचा कोविड व्यवस्थापनामध्ये काहीही भूमिका नाही. परंतु असे असतानाही डॉक्टरांकडून प्लाझ्मा सुचविला जातो. त्यानंतर नातेवाईकांची धावपळ होते. त्यामुळे कोविड टास्क फोर्सला विनंती आहे की सर्व डॉक्टरांना प्लाझ्मा संदर्भात योग्य ती माहिती देऊन आमचे म्हणणे त्यांच्यापर्यंत पोहोचवावे, अशी विनंती खा.कोल्हे यांनी यावेळी केली.

केंद्र सरकारकडून नेमके किती व्हेटिंलेटर आले त्यापैकी किती कार्यान्वित आहेत. केंद्रीयमंत्री प्रकाश जावडेकर यांनी काही दिवसांपुर्वी पुणे जिल्ह्याला दिलेल्या व्हेटिंलेटर संदर्भात माहिती दिली होती. परंतु त्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुराव्यासाठी काही मदत लागल्यास आम्ही खासदार सदैव तयार आहोत, असा विश्वास खा. डॉ. अमोल कोल्हे यांनी यावेळी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *