पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कार्यक्षेत्रातील स्मशानभूमीमध्ये कोरोना मृतांच्या अंत्यविधीसाठी सरपण विनामूल्य मिळणार-महापौर आयुक्त राजेश पाटील…

रोहित खर्गे
विभागीय संपादक

पिंपरी चिंचवड – १७ एप्रिल
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कार्यक्षेत्रातील सर्व स्मशानभूमीमध्ये कोरोना मृतांना पारंपारिक पद्धतीने अंत्यविधी करण्यासाठी विनामूल्य सरपण देण्याची घोषणा आज दि. १७ एप्रिल रोजी आयुक्त राजेश पाटील यांनी केली आहे. महापौर उषा उर्फ माई ढोरे, स्थायी समिती सभापती ऍड. नितीन लांडगे, सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी आयुक्त राजेश पाटील यांच्याशी चर्चा करून हा निर्णय घेण्यात आला आहे.
कोरोना मृतांचा अंत्यविधी हा फक्त विद्युत दाहिनीमध्ये करण्याचे महापालिकेचे नियोजन होते. परंतु, शहरात उपचारासाठी शहराबाहेरील व ग्रामीण भागातील कोविड संसर्ग रुग्ण येतात. दुर्दैवाने उपचारादरम्यान काहींचा मृत्यू होतो. त्यामुळे शहरातील कोरोना मृतांच्या संख्येत वाढ होत असल्याने दैनंदिन कार्यपद्धतींवर ताण वाढतो. त्याचा परिणाम म्हणून स्मशानभूमी परिसरात अंत्यविधीसाठी नंबर लावण्याची परिस्थिती निर्माण होते. अशी परिस्थिती शहरातील स्मशानभूमीमध्ये ओढवू नये, यासाठी कोविडमुळे मृत पावलेल्या व्यक्तींवर पारंपारिक पद्धतीने अंत्यविधी पार पाडण्याचा निर्णय महापालिकेकडून घेण्यात आला आहे. यासाठी लागणारे सरपण विनामूल्य देण्यात येणार आहे. फक्त कोविड काळात कोविड संसर्गाने मृत पावलेल्या व्यक्तींच्या अंत्यविधीसाठी हा निर्णय घेण्यात आला असून सरपण खरेदीचा खर्च महापालिका उचलणार असल्याची माहिती सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी दिली.