स्मार्ट सिटी सायबर हल्ल्याची राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या सीआयडी मार्फत चौकशी करा.- भापकरांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, व नगर विकास मंत्र्यांना पत्र.

रोहित खर्गे
विभागीय संपादक

पिंपरी दि ४ एप्रिल २०२१
स्मार्ट सिटी प्रकल्पातील २७ सर्व्हरमधील डेटा चोरी झाल्याने पिंपरी – चिंचवडकरांची सुरक्षा धोक्यात आली आहे. नागरिकांचा डेटा चोरट्यांच्या हाती लागल्याने त्याचे गंभीर परिणाम व्यक्ती आणि व्यवसायिकांना भोगावे लागणार आहेत. १५ कोटी खर्चुनही उच्च दर्जाची सुरक्षा पुरविण्याकामी ’टेक महिंद्रा कंपनी’ अपयशी ठरली आहे. सायबर हल्ल्याला बारा दिवस झाल्यावर महापालिका यंत्रणा जागी झाल्याने शंका बळाविल्या आहेत. ५२५ कोटी रुपयांच्या कंत्राटात महापालिका कोणाचे ’लाड’ पुरवितेय असा सवाल निर्माण झाला आहे. या प्रकाराला ‘टेक महिंद्रा कंपनी’ सर्वस्वी कारणीभूतआहे. विविध कंपन्यांशी संगनमत करणारे स्मार्ट सिटीचे जॉर्इंट सीईओ नीळकंठ पोमण यांचा अकार्यक्षमपणा उघड झाला असून त्यांच्यावर कारवाई व्हावी.
स्मार्ट सिटी अंतर्गत टेक महिंद्रा या कंपनीला काम देण्यात आले आहे. पिंपरी – चिंचवड स्मार्ट सिटीच्या सर्व्हरवर अज्ञात व्यक्तीद्वारे रॅन्समवेअर हल्ला झाल्याची तक्रार टेक महिंद्रा कंपनीचे प्रोग्राम मॅनेजर महेंद्र लक्ष्मीनारायण लाठी यांनी पोलिसांकडे केली आहे. याच तक्रारीत कंपनीने वस्तुस्थिती दडविण्याचा प्रयत्न केला आहे. विसंगत आणि दिशाभूल करणारी माहिती कंपनीने पोलिसांना दिली आहे. कंपनी एकिकडे म्हणते की, रॅन्समवेअर हल्ल्यात चीन, रशिया, फ्रान्स आणि जर्मनी या देशातून कोणी अज्ञात व्यक्तीने सर्व्हरमध्ये अनधिकृतरीत्या प्रवेश करण्याचा प्रयत्न केला आहे. दुसरीकडे कंपनी मान्य करते की, अज्ञात व्यक्तीने सर्व्हरमध्ये प्रवेश करुन महत्वाचा डेटा इन्क्रिप्ट केला असून महत्वाचा डेटा डिक्रीप्ट करण्याकरीता बिटकॉईन द्वारे पैशाची मागणी करत आहेत. एकिकडे प्रवेश करण्याचा प्रयत्न झाला म्हणतात आणि दुसरीकडे प्रवेश करुन डेटा चोरला म्हणतात, हे संशयास्पद आहे.