आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांना रुग्णालयातून डिस्चार्ज; डॉक्टरांच्या विश्रांतीच्या सल्ल्यामुळे त्यांना भेटण्यासाठी न येण्याचे शंकर जगताप यांचे कार्यकर्त्यांना आवाहन

रोहित खर्गे
विभागीय संपादक
०२ जून २०२२

पिंपरी


भाजपचे आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. त्यांच्या तब्येतीत चांगली सुधारणा झाल्यामुळे आज (गुरूवार) त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. पिंपरी-चिंचवडमधील जनता, कार्यकर्ते व हितचिंतकांचे प्रेम आणि प्रार्थना तसेच डॉक्टरांचे उपचार यामुळे भाऊंची प्रकृती चांगली झाल्याचे आमदार जगताप यांचे बंधू व माजी नगरसेवक शंकर जगताप यांनी सांगितले. त्याबद्दल त्यांनी सर्वांचे आभार मानले आहेत. तसेच डॉक्टरांनी भाऊंना काही दिवस आराम करण्याचा सल्ला दिला आहे. भाऊ लवकरच पुन्हा नव्या जोमाने आपल्या कामाला सुरूवात करतील, त्यावेळी ते सर्वांनाच भेटतील. आता त्यांना विश्रांतीची गरज आहे. त्यामुळे त्यांच्यावर प्रेम करणारे कार्यकर्ते व हितचिंतकांनी त्यांना भेटण्यासाठी निवासस्थानी गर्दी करू नये. कार्यकर्त्यांनी आपापल्या परिसरात जनसेवा अखंड सुरू ठेवावी, असे आवाहनही माजी नगरसेवक शंकर जगताप यांनी केले आहे.

आमदार लक्ष्मणभाऊ जगताप हे आजारपणामुळे बाणेर येथील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये दाखल होते. तेथे त्यांच्यावर गेल्या दीड महिन्यांपासून उपचार सुरू होते. ते रुग्णालयात दाखल झाल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातून सर्वपक्षीय नेते धावले होते. आमदार जगताप यांच्या कुटुंबियांची भेट घेत प्रकृतीची विचारपूस केली होती. भाऊंच्यावर प्रेम करणाऱ्या असंख्य कार्यकर्त्यांनी गेल्या दीड महिन्यांपासून रुग्णालयात ठाण मांडले होते. संपूर्ण पिंपरी-चिंचवडमध्ये विविध जाती-धर्माच्या नागरिकांनी लक्ष्मणभाऊंच्या आरोग्यासाठी प्रार्थनास्थळांमध्ये प्रार्थना, होमहवन केले होते. कार्यकर्त्यांचे हे प्रेम आणि प्रार्थना फळाला आली आणि लक्ष्मणभाऊंची तब्येत एक महिन्यानंतर स्थिर झाली.
आता त्यांच्या तब्येतीत चांगली सुधारणा झाली आहे. त्यामुळे रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांना डिस्चार्ज देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार त्यांना गुरूवारी घरी सोडण्यात आले. यावेळी लक्ष्मणभाऊ यांचे संपूर्ण कुटुंबीय आणि त्यांच्या प्रेम करणारे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. लक्ष्मणभाऊंना रुग्णालयातून घरी सोडण्यात येणार असल्याची बातमी समजल्यानंतर त्यांना पाहण्यासाठी आणि त्यांच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांनी प्रचंड गर्दी केली होती. ते रुग्णालयातून घरी येताच कार्यकर्त्यांनी त्यांचे प्रचंड जल्लोषात स्वागत केले.

यासंदर्भात बोलताना माजी नगरसेवक शंकर जगताप म्हणाले, “पिंपरी-चिंचवडमधील जनता, कार्यकर्ते व हितचिंतकांचे प्रेम आणि प्रार्थनेमुळे भाऊंची प्रकृती उत्तम आहे. ज्युपिटर हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी केलेल्या उपचारामुळे भाऊ आज आपल्यात पुन्हा परतले आहेत. या कठीण काळात शहरातील जनता, कार्यकर्ते व हितचिंतकांनी दिलेले प्रेम संपूर्ण जगताप कुटुंबीय कधीच विसरू शकणार नाही. डॉक्टरांनी भाऊंना काही दिवस आराम करण्याचा सल्ला दिला आहे. भाऊ लवकरच पुन्हा नव्या जोमाने आपल्या कामाला सुरूवात करतील, त्यावेळी ते सर्वांनाच व्यक्तिश: भेटतील. आता त्यांना विश्रांतीची गरज आहे. त्यामुळे त्यांच्यावर प्रेम करणारे कार्यकर्ते व हितचिंतकांनी त्यांना भेटण्यासाठी निवासस्थानी गर्दी करू नये. कार्यकर्त्यांनी आपापल्या परिसरात जनसेवा अखंड सुरू ठेवावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.”


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *