रोहित खर्गे
विभागीय संपादक
पिंपरी चिंचवड दि. ३० मार्च
महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील तरतुदींनुसार मा. आयुक्त यांच्या अधिकारात सन २०२१- २२ या आर्थिक वर्षापासुन शहरातील जुन्या मिळमतींच्या करयोग्यमुल्यामध्ये वाढ होणार होती. परंतु कोरोना महामारीमुळे घायाळ झालेल्या नागरिकांना करवाढीचा बोजा वाढु नये म्हणून महापौर ऊषा उर्फ माई ढोरे, सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, स्थायी समिती सभापती नितीन लांडगे व उपमहापौर हिराबाई उर्फ नानी घुले यांनी आयुक्त राजेश पाटील यांच्याशी चर्चा करुन यंदाच्या करवाढीला स्थगिती देण्यासंदर्भात सुचना केल्या. हि सुचना मान्य करुन आयुक्त यांनी सन २०२१- २२ या आर्थिक वर्षात कुठल्याही मिळकतींना कर लादु नये असे आदेश संबधित विभागाला दिले आहेत.
महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील अनुसूची ड प्रकरण ८ कराधान नियम मधील नियम ७ मधील तदतुदीनुसार आयुक्तांनी त्यांच्या अधिकारात शहरातील जुन्या व नविन मिळकतींचे करयोग्यमूल्य व बिलामध्ये असलेली तफावत कमी करण्यासाठी सन २०२१- २२ या आर्थिक वर्षापासुन जुन्या मिळकतींच्या करयोग्यमुल्याचे पुनर्मुल्यांकन करुन ते मा. स्थायी समिती कडे अवलोकनार्थ पाठविण्यात आले होते. त्यावर मा. स्थायी समितीने शहरातील नागरिकांचे कोरोना महामारी मुळे मोठया प्रमाणात आर्थिक नुकसान झाले असल्यामुळे शहरातील नागरिकांवर कोणत्याही प्रकारची करवाढ लादन्यात येवू नये असे सुचविले होते. तसेच यापुर्वीप्रमाणे सुरु असलेली मिळकत करआकारणी यापुढे चालू ठेवावी असा निर्णय घेवून मा. आयुक्तांचा जुन्या मिळकतींच्या करयोग्यमुल्य वाढीचा प्रस्ताव दप्तरी दाखल करण्यास मान्यता मिळणेसाठी मा. सर्वसाधारण सभेकडे सादर केला होता. त्यानुसार मा. सर्वसाधारण सभेमध्ये सदरचा प्रस्ताव दप्तरी दाखल करणेत आला आहे. या निर्णयामुळे शहरातील निवासी व बिगरनिवासी मिळकत धारकांना मोठा दिलासा मिळणार आहे अशी माहिती महापौर महापौर ऊषा उर्फ माई ढोरे व सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी दिली.