119 उमेदवारांनी कागदपत्र पडताळणीकडे फिरवली पाठ

१० नोव्हेंबर २०२२

पुणे


पुणे महापालिकेकडून राबविण्यात आलेल्या भरती प्रक्रियेतील गुणवत्ता यादीत असलेल्या 119 उमेदवारांनी कागदपत्र पडताळणीकडे पाठ फिरवली आहे. तर, अनेक उमेदवारांनी कनिष्ठ अभियंतापदासाठी कंपनीत काम केल्याचे बनावट अनुभव प्रमाणपत्र दिल्याचे समोर आले आहे. महापालिकेकडून कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी), कनिष्ठ अभियंता (वाहतूक नियोजन), कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), सहायक विधी अधिकारी, सहायक अतिक्रमण निरीक्षक आणि लिपीक अशा 448 पदांसाठी भरती प्रक्रिया हाती घेतली आहे. यासाठी 87 हजार 471 अर्ज आले होते. मात्र, यापैकी सरासरी 70 टक्के उमेदवारांनीच परीक्षा दिली. भरती प्रक्रियेत गैरव्यवहार होऊ नयेत, यासाठी महापालिकेने परीक्षेचे काम इंडियन बँकिंग पर्सेनल सिलेक्शन (आयबीपीएस) या संस्थेला दिले आहे. या संस्थेने ऑनलाइन माध्यमातून ही परीक्षा घेऊन लिपिक सोडून इतर पदांचे निकाल महापालिकेला दिले आहेत. महापालिकेने उमेदवारांची गुणवत्ता यादी जाहीर केली असून, मेरिटनुसार कागदपत्रांच्या पडताळणीसाठी उमेदवारांना बोलावले आहे.

कनिष्ठ अभियंतापदासाठी पहिल्या फेरीत गुणवत्ता यादीतील 19 जणांनी, तर दुसऱ्या फेरीत तब्बल 100 जणांनी कागदपत्र पडताळणीकडे पाठ फिरवली आहे. काही दिवसांपूर्वी लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचे निकाल जाहीर झाले आहेत. स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांनी महापालिकेच्या भरती प्रक्रियेत भाग घेतल्याने तसेच कागदपत्रांच्या कमतरतेमुळे उमेदवारांनी पाठ फिरविल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. दरम्यान, कनिष्ठ अभियंत्यांना कंपनीत काम केल्याने अनुभव प्रमाणपत्र बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे कंपनीचे नियुक्तिपत्र, वेतन प्रमाणपत्र, बँकेचे स्टेटमेंट आदींसह विविध कागदपत्रांची पडताळणी केली जाते. यामध्ये अनेकांनी अनुभवाचे बोगस प्रमाणपत्र दिल्याचे समोर आले आहे. त्यामुळे प्रशासनाला कागदपत्र पडताळणी करताना तारेवरची कसरत करावी लागणार आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *