जेष्ठ कीर्तनकार व शिवनेरभूषण भागवताचार्य ह.भ.प.सुमंत महाराज नलावडे यांचे निधन

नारायणगाव (किरण वाजगे, कार्यकारी संपादक)

जुन्नर तालुक्यातील वारकरी सांप्रदायातील जेष्ठ किर्तनकार शिवनेरभूषण ह.भ प.सुमंत महाराज नलावडे ( वय ८८) यांचे व्रुद्धापकाळाने निधन झाले
सुमंतजी महाराज नलावडे यांचा जन्म जुन्नर तालुक्यातील धोलवड येथे झाला. त्यांनी वयाच्या तेराव्या वर्षीच भागवत धर्माची पताका खांद्यावर घेतली. गुंजाळवाडी गावचे थोर संत वैकुंठवासी ह.भ.प. सहादूबाबा वायकर यांच्याकडून वारकरी सांप्रदयाची दिक्षा घेतली. त्यानंतर त्यांनी किर्तन व प्रवचनाच्या माध्यमातून महाराष्ट्रभर वारकरी सांप्रदायाचा प्रचार व प्रसार केला. त्यांनी ओतूर ते पंढरपूर ही
चैतन्य महाराज पालखी सुरु करण्यात तसेच पिंपळवंडी येथील ग्रामदैवत मळगंगा मायेचा नवरात्र उत्सवातील अखंड हरिनाम सप्ताह सुरु करण्यातही त्यांचा मोलाचा वाटा होता.
तसेच अहमदनगर जिल्ह्यातील राहता येथून श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर दिंडी सोहळा देखील सुरु केला होता. त्यांनी त्यांच्या धोलवड गावी संत तुकाराम महाराज बिजेनिमित्त अखंड हरिनाम सप्ताह सुरु केला त्यांनी या सप्ताहाच्या सांगता समारंभात राज्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार देऊन गुणगौरव केला होता त्यांनी अनेक ठिकाणी भागवत ग्रंथावर आधारीत कथा कार्यक्रम केले. त्यामुळे वारकरी सांप्रदयात त्यांची भागवताचार्य अशी ओळख निर्माण झाली होती. वारकरी सांप्रदयात त्यांनी केलेल्या भरीव कार्याची दखल घेऊन शिवजयंतीच्या शुभमुहूर्तावर त्यांना शिवनेरभूषण हा मानाचा पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला होता
त्यांच्या निधनानंतर त्यांचे पार्थिव धोलवड येथील संत तुकारामनगर येथील त्यांच्या निवासस्थानी ठेवण्यात आले होते. यावेळी वारकरी सांप्रदयातील कीर्तन व प्रवचनकार त्यांचे शिष्यगण नातेवाईक आणि धोलवड ग्रामस्थांनी त्यांच्या पर्थिवाचे दर्शन घेण्यासाठी गर्दी केली होती.
त्यांची अंत्ययात्रा त्यांच्या निवासस्थानपासून काढण्यात आली. त्यानंतर ग्रामप्रदिक्षणा घालून त्यांच्या निवासस्थानी असलेल्या संत तुकाराम महाराजांच्या मंदिरासमोर त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
यावेळी वारकरी सांप्रदयाबरोबरच माजी आमदार बाळासाहेब दांगट, तसेच सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, धार्मिक, वैद्यकीय आदी क्षेत्रातील अनेक मान्यवर अंत्यविधीसाठी उपस्थित होते.