नारायणगाव येथे आत्महत्या प्रकरणी सात जणांना अटक | तीन महिलांसह सात जणांवर कारवाई…

नारायणगाव (किरण वाजगे कार्यकारी संपादक)

नारायणगाव (तालुका जुन्नर) येथील वाजगे आळी परिसरात राहणाऱ्या आनंद वसंत शिंदे या युवकाने दिनांक ३० जानेवारी  रोजी  सकाळी साडे आठ वाजण्यापूर्वी आत्महत्या केल्याप्रकरणी नारायणगाव पोलिसांनी वारूळवाडी येथे राहणाऱ्या सात जणांवर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी शकुंतला वसंत शिंदे (वय ३८, राहणार इंदिरानगर, वारुळवाडी) यांनी नारायणगाव पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे.

 या घटनेमध्ये आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल आरोपी शकुंतला मधु भालेकर, अलका ज्ञानदेव ओव्हाळ, कोंडाबाई सुरेश गायकवाड, रवींद्र ज्ञानदेव ओव्हाळ, दीपक दिवाकर साळवे, विशाल सुरेश गायकवाड, ज्ञानदेव राजाराम ओव्हाळ (सर्व राहणार इंदिरानगर, वारुळवाडी) यांच्यावर भा.द.वि. कलम ३०६, ३४ नुसार नारायणगाव पोलिसांनी कारवाई केली असून न्यायालयाच्या आदेशानुसार या सातही जणांची येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली. असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुंड यांनी दिली.

 याबाबत थोडक्यात माहिती अशी की, ३० जानेवारी रोजी सकाळी साडे आठ वाजण्यापूर्वी आरोपींनी  फिर्यादीचा भाऊ मयत आनंद वसंत शिंदे यास शकुंतला भालेकर हिस मारहाण केल्याच्या कारणावरून हात पाय मोडण्याची तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. यामुळे मयत आनंद शिंदे हे तणावात आले व त्यांनी सर्व आरोपींना घाबरून व टेन्शनमध्ये येऊन, तसेच त्रास दिल्याच्या कारणावरून स्वतःच्या राहत्या घराच्या छताला ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. या कारणांवरून वरील सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने सातही आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली.

या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गुलाबराव हिंगे पाटील हे करीत आहेत. 

दरम्यान या आरोपींपैकी रवींद्र ज्ञानदेव ओव्हाळ याचे दिनांक ३१ जानेवारी रोजी लग्न होणार होते. मात्र लग्न बाजूला राहिले त्याला थेट येरवडा जेलची हवा खावी लागली. यामुळे परिसरात या घटनेमुळे चर्चेला उधाण आले आहे.