छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन

किरण वाजगे,पवन गाडेकर
बातमी प्रतिनिधी
२२ एप्रिल २०२२

जुन्नर


छत्रपती शिवरायांच्या जन्माने पावन झालेल्या किल्ले शिवनेरीच्या पायथ्यापाशी जुन्नर नगरीच्या पाच रस्ता चौकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याचे अनावरण मोठ्या उत्साहात आणि आनंदात करण्यात आले. यावेळी आकर्षक विद्युत रोषणाई पारंपरिक वाद्य यासह डीजेच्या तालावर शिवभक्त आनंदात डौलाने थिरकले. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते हे भव्य दिव्य उद्घाटन झाले.

दरम्यान छोट्या पडद्यावर छत्रपती शिवाजी महाराज तसेच छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका साकार करणारे, शिवजन्मभूमीचे सुपुत्र व शिरूर लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे हे शिवजयंती नंतर आज सुद्धा झालेल्या भव्य दिव्य कार्यक्रमास उपस्थित नसल्यामुळे अनेक शिवभक्तांनी नाराजी व्यक्त केली.

याप्रसंगी आमदार अतुल बेनके, माजी आमदार बाळासाहेब दांगट, राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र सरचिटणीस किशोर दांगट, बाजार समितीचे सभापती संजय काळे, विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशिल शेरकर, जिल्हा परिषद सदस्या आशाताई बुचके, पुणे जिल्हा बँकेच्या संचालिका पूजा बुट्टे पाटील, उज्वला शेवाळे, जुन्नर चे नगराध्यक्ष श्याम पांडे, उपनगराध्यक्ष दीपेश परदेशी, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष पांडुरंग पवार, विघ्नहर देवस्थानचे अध्यक्ष गणेश कवडे, देवराम लांडे, शरद लेंडे, शहराध्यक्ष पापा खोत तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दरम्यान गेल्या अनेक दिवसांपासून पुणे जिल्ह्यात गाजत असलेला बिबट सफारीच्या प्रश्नावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर आश्वासन देत जुन्नर तालुक्यात बिबट्या सफारी होण्यासाठी हिरवा कंदील दाखविला. यासाठी दीड कोटी रुपये प्रकल्प आराखड्यासाठी (डीपीआर साठी) त्यांनी घोषित केले.

यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की भारतामध्ये आदिलशाही मुघलशाही कुतुबशाही अशा अनेक राजवटी उदयाला आल्या मात्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजवटीला रयतेचे राज्य असेच संबोधले गेले यापुढे देखील जुन्नर तालुक्याच्या विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही. गवळी आमदार अतुल बेनके यांनी जुन्नर तालुक्यात बिबट्या सफारी करावी असा माझा हट्ट आहे असे सांगितले प्रास्तविक नगराध्यक्ष शाम पांडे यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार उपनगराध्यक्ष दीपेश परदेशी यांनी मानले. दरम्यान या कार्यक्रमासाठी शिवसेनेचे जुन्नर तालुका संपर्कप्रमुख दिलीप बाम्हणे, तालुकाप्रमुख माऊली खंडागळे, जिल्हा परिषद सदस्य गुलाब शेठ पारखे, युवा सेनेचे विकी पारखे, सरपंच योगेश पाटे, विकास राऊत, जुन्नर शिवसेना शहर प्रमुख चंद्रकांत डोके हे व्यासपीठाच्या डाव्या बाजूला काही काळ उपस्थित होते. मात्र त्यांचा नामोल्लेख न झाल्यामुळे त्यांनी कार्यक्रमातून काढता पाय घेत नाराजी व्यक्त केली.

 


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *