सरकारने घोषणेला जागुन निर्णय घ्यावा.
बातमी -दत्ता गाडगे विभागीय संपादक पारनेर :-
कोरोनामुळे मृत्यू झालेले टिव्ही 9 वृत्त वाहिनीचे पत्रकार पांडुरंग रायकर (पुणे) यांच्यासह संतोष भोसले (गेवराई, जिल्हा बीड), गंगाधर सोमवंशी (लातूर), जयप्रकाश डिगराळे (नंदुरबार) या मयत पत्रकारांच्या कुटुंबियांना शासनाने घोषणा केल्याप्रमाणे 50 लाख रुपयांच्या विमा कवच अंतर्गत नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांना एका लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
महाराष्ट्रात करोना काळात पत्रकारांचा मृत्यू झाला तर त्यांनाही आरोग्य व पोलिस कर्मचार्यांप्रमाणे पन्नास लाख रुपयांच्या विमा कवच अंतर्गत पत्रकारांच्या कुटुंबियांनाही मदत केली जाईल अशी घोषणा राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी बुलढाणा येथे पत्रकार परिषदेत दि. 3 जून रोजी केली. मात्र तीन महिने लोटले तरी सरकारी आदेश काढला नाही. पुण्यात टीव्ही9 वृत्तवाहिनीचे पत्रकार पांडुरंग रायकर यांना वेळेवर रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने आणि योग्य उपचार न मिळाल्याने मृत्युला सामोरे जावे लागले.
रायकर हे वृत्तवाहिनीचे पत्रकार असल्याने दोन दिवसां पासून राज्यस्तरावरील प्रसार माध्यमांसह विविध पक्ष संघटनांनी या घटनेवरुन सरकारला धारेवर धरले. सरकारी यंत्रणा खडबडून जागी झाली. विविध राजकीय पक्षाच्या पुढार्यांनी आर्थिक मदतीच्या घोषणा केल्या. परंतु अशा घोषणांचे आणि सरकारी चौकश्यांचे काय होते? ही बाब सर्वश्रृत आहे. त्यामुळे पक्ष आणि संघटनांच्या मदतीपेक्षा सरकारने घोषणा केल्याप्रमाणे मदत करणे आवश्यक आहे. यासाठी राज्यस्तरावरील माध्यमांनी आवाज उठवावा.
मागील दोन महिन्यात कोरोनामुळे गेवराई (जि.बीड) येथील सामनाचे पत्रकार संतोष भोसले यांचा सरकारी रुग्णालयातील कोव्हीड कक्षात 28 जुलै रोजी मृत्यू झाला. तर लातुर येथील ज्येष्ठ पत्रकार गंगाधर सोमवंशी यांचाही 29 जुलै रोजी सरकारी रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. सोमवंशी यांना तर खाजगी रुग्णालयात उपचारासाठी 75 हजार रुपये भरण्याची मागणी करण्यात आल्यानंतर पैसे नसल्याने ते सरकारी रुग्णालयात दाखल झाले. मृत्युपूर्वी त्यांनी चिठ्ठी लिहून आर्थिक विवंचना आणि व्यवस्थेची विदारकता स्पष्ट केली होती. तर नंदुरबार येथील जयप्रकाश डिगराळे यांचाही 12 ऑगस्ट रोजी उपचार सुरू असताना मृत्यू झाला. कोरोनामुळे ग्रामीण भागात काम करत असताना तीन पत्रकारांचा मृत्यू झाल्यानंतर राज्य मराठी पत्रकार संघाने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आरोग्यमंत्री यांच्याकडे लेखी निवेदन देऊन घोषणा केल्याप्रमाणे त्यांच्या कुटुंबियांना मदत करण्याची मागणी केली. मात्र याकडे सरकारने दुर्लक्ष केले आहे. तर ग्रामीण भागातील पत्रकारांच्या मृत्युकडेही राज्यस्तरावरील माध्यमांनीही फारसे लक्ष दिले नसल्याचे विदारक सत्य आहे.
ग्रामीण भागातील पत्रकाराचाही कोरोनामुळेच मृत्यू झाला आहे. असे असतानाही प्रशासकीय यंत्रणा आणि सरकार घोषणा करुनही मदत करण्याकडे दुर्लक्ष करत आाहे याकडे राज्य पत्रकार संघाने लक्ष वेधले आहे.
टिव्ही 9 चे प्रतिनिधी पांडुरंग रायकर हे पुण्यात काम करीत होते. त्यामुळे ते आजारी असतांना त्यांच्या सहकारी पत्रकार मित्रांनी रायकर यांना योग्य ते उपचार मिळावेत यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. परंतु पुणे महानगर पालिका, जम्बो कोव्हीड सेंटर व तेथील इतर खासगी रुग्णालय प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे तसेच प्रशासकीय अधिकारी, संबंधित रुग्णालयाचे डॉक्टर्स, नर्सेस, इतर वैद्यकीय कर्मचारी यांच्या निष्काळजी पणामुळे त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे या सर्व दोषी व्यक्तींवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करावा आणि पत्रकारांना राज्यात प्रत्येक शहरामधील रुग्णालयांमध्ये खाटा राखीव ठेवाव्यात अशी मागणी राज्य पत्रकार संघाच्या वतीने केली आहे. मयत पत्रकारांच्या कुटुंबियांचे पुनर्वसन करण्यासाठी त्यांना आर्थिक मदत करुन मुलांना चांगले शिक्षण, घरे व इतर आवश्यक त्या सोयीसुविधा मिळाव्यात यासाठी तरी शासनाने घोषणा केल्याप्रमाणे निर्णय घ्यावा अशी मागणी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे, राज्य संघटक संजय भोकरे, वृत्तवाहिनी अध्यक्ष रणधीर कांबळे, सरचिटणीस विश्वास आरोटे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.