वेळीच उपचार न मिळालेल्या ज्येष्ठ नागरिकाचा नारायणगावात मृत्यू

उपचार नाकारणाऱ्या डॉक्टरांविषयी रुग्णांमध्ये संताप

नारायणगाव:- (किरण वाजगे, कार्यकारी संपादक)
नारायणगाव येथील एका रूग्णालयात उपचारासाठी आलेल्या एका रूग्णास डॉक्टरने दाखल करून न घेतल्याने एका जेष्ठ रूग्णाचा ह्दयविकाराच्या झटक्याने मृत्यु झाला आहे. काही दिवसांपूर्वी अशाच घटनेतून एका निवृत्त कला शिक्षकाचा कोरोना अहवाल निगेटिव्ह असताना देखील केवळ डाॅक्टरांनी उपचारासाठी दाखल न केल्याने ऑक्सिजन अभावी या शिक्षकाला देखील आपले प्राण गमवावे लागले आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नारायणगाव मधील काही डॉक्टर रुग्णांना उपचारासाठी दाखल करून घेत नसल्यामुळे रुग्णांना प्राण गमवावे लागत आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, मांजरवाडी येथील शंकर सिताराम भालेकर (वय ६६) सध्या राहणार नारायणगाव यांना दि १ सप्टेंबर रोजी अस्वस्थ वाटत होते. म्हणून त्यांना नारायणगाव येथे खोडद रोड वर असलेल्या एका जेष्ठ डाॅक्टरकडे नेण्यात आले. परंतु डाॅक्टरने त्यांना न तपासता हाॅस्पिटल मधील अन्य व्यक्तीना त्यांना गाडीतच तपासून दुस-या डाॅक्टरकडे नेण्यास सांगितले. यावेळी रूग्णासमवेत असलेला त्यांचा मुलगा गणेश भालेकर यांनी वडिलांना अॅडमिट करून घेण्याबाबत खूप विनंती केली. तरी देखील त्यांना उपचारासाठी अॅडमिट करण्यास डॉक्टरांनी नकार दिला. दरम्यानच्या कालावधीत बराच वेळ निघून गेल्यामुळे शंकर भालेकर यांची प्रकृती चिंताजनक होवून त्यांचा मृत्यु झाला. त्या अगोदर दोन दिवसांपूर्वी अन्य एका डाॅक्टरने देखील भालेकर यांना उपचारासाठी दाखल न करून घेता केवळ गोळया, औषधे दिली मात्र अॅडमिट करण्यास नकार दिला होता. या दोन्ही डाॅक्टरांच्या हलगर्जीपणामुळे भालेकर यांना आपला जीव गमवावा लागला.

दरम्यान, नुकतेच नारायणगाव येथील एका निवृत्त शिक्षकाचे दि.२३ ऑगस्ट रोजी निधन झाले. सदर शिक्षकाला कोरोना नसताना देखील खोडद रोड वरील याच डॉक्टरने त्यांना उपचारासाठी दाखल करून न घेतल्याने त्यांची ऑक्सिजन लेवल कमी झाली त्यांना नारायणगाव मधील इतर रुग्णालयात सुद्धा हलविण्यात आले होते. मात्र कुणीही त्यांना दाखल करून न घेतल्याने केवळ ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे त्यांना आपला जीव गमवावा लागला.

दरम्यान, ह्दयविकाराचा झटका आला असताना उपचारासाठी दाखल न करणा-या डाॅक्टरांविरूद्ध मृत्यु झालेल्या शंकर भालेकर यांचा मुलगा गणेश भालेकर यांनी जिल्हाधिकारी, आरोग्य विभाग व मेडिकल कौन्सिल यांच्याकडे लेखी तक्रार करून डाॅक्टर वर कारवाई करण्याची मागणी करणार असल्याचे सांगितले.

डॉक्टर अनेक रुग्णांना मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढतात. त्यामुळे डॉक्टर मध्येच त्यांना देव दिसतो मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देव म्हणणाऱ्या या डॉक्टरांनी रुग्णांवर उपचार न करता त्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. या सर्व बाबींमुळे नारायणगाव, वारूळवाडी परिसरातील नागरिकांमध्ये चिड निर्माण झाली असून अशा डॉक्टरांवर कारवाई करावी अशी मागणी देखील होत आहे.

दरम्यान या घटनांना नारायणगावातील काही डॉक्टर अपवाद ठरत आहेत. वय वर्ष ७६ झाले असताना येथील जुन्या पिढीतील डॉक्टर एस जी गोसावी हे १९७० सालापासून आजपर्यंत सर्व प्रकारच्या रुग्णांना अविरत सेवा देत आहेत. वयाच्या ७६ व्या वर्षी देखील सर्व प्रकारच्या रुग्णांना ते आजही उपचार देत आहेत याच कारणामुळे त्यांना नुकतेच काही संस्थांच्या वतीने गौरवण्यात देखील आले आहे. अशाच प्रकारे नव्याने नारायणगावात रुग्णांची सेवा करणारे डॉ लहू खैरे, डॉ. हनुमंत भोसले, डॉ. मिलिंद घोरपडे यांच्यासारखे डॉक्टर स्वतःच्या क्लिनिक बरोबरच ग्रामीण रुग्णालयात देखील कोवीड रुग्णांची सेवा करीत आहेत. अशा काही चांगल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांमुळे सर्वसामान्य रुग्णांमध्ये डॉक्टरांविषयी सकारात्मक भावना आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *