जिल्हा परिषदे च्या जागेचा ताबा घेण्याचा अधिकार सरपंचांना कोणी दिला – चंद्रशेखर को-हाळे
नारायणगाव येथील सिटी सर्वे नंबर १४६३ या जागेचा वाद वेगळ्या वळणावर
नारायणगाव (किरण वाजगे)नारायणगाव येथील सिटी सर्वे नंबर १४६३ या जागेचा वाद आता वेगळ्या वळणावर जाऊ लागला असून जर ही जागा जिल्हा परिषदेच्या मालकीची आहे तर त्या जागेबद्दल पत्रकार परिषद घेऊन आपला दावा सांगण्याचा अधिकार सरपंचांना कोणी दिला असा सवाल पंचायत समितीचे माजी सदस्य व माजी शिवसेना उपजिल्हाप्रमुख चंद्रशेखर को-हाळे यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये केला.
नारायणगाव येथील धनसंचय सहकारी पतसंस्थे मध्ये आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत चंद्रशेखर कोऱ्हाळे बोलत होते. याप्रसंगी धनंजय कोऱ्हाळे व कार्यकर्ते उपस्थित होते.
नारायणगाव चे सरपंच योगेश पाटे यांनी गुरुवार दिनांक १३ रोजी पत्रकार परिषद घेऊन सिटी सर्वे नंबर १४६३ या जागेवर जिल्हा परिषदेचा अधिकार असल्याचा दावा केला होता. याला उत्तर देण्यासाठी आज कोऱ्हाळे यांनी पत्रकार परिषद घेतली. यामध्ये त्यांनी सरपंच योगेश पाटे यांचा मुद्दा खोडून काढताना म्हटले की, ज्या कारणासाठी ही जागा १९६४ साली प्राथमिक शिक्षण सेवा संघ यांनी खरेदीखत करून घेतली आहे, त्याच करण्यासाठी ती जागा वापरात आहे. त्यानुसार तेथे गेली नऊ वर्षांपासून शाळा सुरू आहे. त्या जागेचा वापर कुठल्याही इतर गोष्टींसाठी केला नसून सरपंच योगेश पाटे यांना या जागेत ढवळाढवळ करण्याचा अधिकार जिल्हा परिषदेने दिला आहे का, असा सवालही त्यांनी केला.
या जागेविषयी चंद्रशेखर कोऱ्हाळे पुढे बोलताना म्हणाले की, जागा रीतसर खरेदीखत करून विकत घेतली असून ही जागा केवळ शाळेसाठी वापरात आहे. जिल्हा परिषदेने आम्हाला कोणत्याही प्रकारची नोटीस दिली नसून या जागेबाबत पत्रकार परिषद घेऊन आम्हाला जाणून बुजून त्रास देण्याचा प्रयत्न सरपंच करीत आहे. वास्तविक पाहता जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी अथवा संबंधित विभागाच्या अधिकाऱ्याने आम्हाला या जागेबाबत कोणतेही पत्र दिले नाही. त्यामुळे सरपंच योगेश पाटे यांनी पत्रकार परिषद घेऊन केलेला दावा केवळ राजकीय विरोधासाठी आहे.