विसाव्या शतकातील जागेचा ताबा एकविसाव्या शतकामध्ये जिल्हा परिषदेकडे

पन्नास वर्षांपूर्वीची जागा पुन्हा जिल्हा परिषदेकडे कशी वर्ग झाली

सरपंच योगेश पाटे यांनी दिली पत्रकार परिषदेमध्ये माहिती

चंद्रशेखर को-हाळे यांना पुन्हा एकदा धक्का

नारायणगाव (किरण वाजगे) नारायणगाव येथील सिटी सर्वे नंबर १४६३ या जागेचा निकाल नुकताच जमाबंदी आयुक्त व भूमी अभिलेख महाराष्ट्र राज्याचे संचालक , पुणे यांनी दिला आहे. त्यानुसार नारायणगाव येथील गोकुळ दूध डेअरी समोरील सुमारे तीस गुंठे जागा ही जिल्हा परिषदेकडे पुन्हा वर्ग करण्यात आली आहे. याबाबतचा निकाल नुकताच लागला असल्याची माहिती सरपंच योगेश पाटे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

विसाव्या शतकात म्हणजेच १९७० साली जिल्हा परिषदेच्या ताब्यात असलेली ही जागा २१ व्या शतकात जानेवारी २०२० मध्ये पुन्हा जिल्हा परिषदेकडे वर्ग झाली असल्याचा आदेश देण्यात आला आहे. या जागेत नारायणगावातील ज्येष्ठ नेते व माजी पंचायत समिती सदस्य चंद्रशेखर को-हाळे यांनी स्थापन केलेली शाळा आहे. त्यामुळे या निकालामुळे त्यांना हा राजकीय धक्का बसल्याची चर्चा गावात सुरू झाली आहे. याबाबत सरपंच योगेश पाटे यांनी पत्रकार परिषद मध्ये सांगितले की या जागेतील असलेली शाळा व त्यातील सुमारे दोनशे ते अडीचशे विद्यार्थी हे इतर शाळांमध्ये भरती करता येतील व व या जागेमध्ये काय विकास कामे करायची किंवा नेमका कुठला प्रकल्प करायचा याबाबत ग्रामसभा तसेच ज्येष्ठ ग्रामस्थांच्या मार्गदर्शनाखाली निर्णय घेतला जाईल.

गावातील इतर प्रलंबित विकास कामे देखील पूर्णत्वास येत आहेत. तसेच बंदिस्त गटारे, सिमेंट कॉंक्रीट रस्ते, गॅस शव दाहिनी, डुकरांचा योग्य सांभाळ, कचऱ्याचे योग्य नियोजन तथा कचरा प्रक्रिया प्रकल्प, सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याचा प्रकल्प तसेच इतर विकास कामे प्राधान्याने केली जातील याची माहिती देखील त्यांनी दिली.