मा. विरोधी पक्ष नेते संतोष बारणे यांना धक्का

प्रसन्न तरडे
बातमी प्रतिनिधी 
०७ डिसेंबर २०२१

पिंपरी-चिंचवड


जनसेवा सहकारी पतसंस्थेचे संस्थापक नारायण बारणे यांचा दोन्ही मुलांसह भाजपामध्ये प्रवेश

पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी भाजपाचे आमदार लक्ष्मण जगताप यांनी जोरदार मोर्चेबांधणी केली असून, जनसेवा सहकारी पतसंस्थेचे संस्थापक नारायण बारणे यांनी भाजपात प्रवेश केला. मुंबई येथील भाजपा कार्यालयात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित नारायण बारणे यांनी दोन्ही मुले रोहित आणि रोहन बारणे यांनी आमदार लक्ष्मण जगताप यांच्या नेतृत्वाखाली भाजपाचे कमळ हातात घेवून पक्षात जोरदार प्रवेश केल्याने पिंपरी – चिंचवड मध्ये एकच खळबळ उडाली आहे.

यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, उपमहाराष्ट्र केसरी विशाल कलाटे, चिंचवड विधानसभा मतदार संघाचे प्रभारी संतोष कलाटे, प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशीव खाडे आदी उपस्थित होते. दरम्यान, वाकड येथील विक्रम कलाटे यांनीही भाजपामध्ये प्रवेश केला आहे.

राष्ट्रवादीचे संतोष बारणे यांना स्वतःच्या घरातून मोठा धक्का…

मा. विरोधी पक्षनेते संतोष बारणे यांनी काही दिवसांपूर्वी भाजप सोडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थित राष्ट्रवादी मध्ये प्रवेश केला होता. भाजपाच्या  नगरसेविका माया बारणे यांचे संतोष बारणे पती आहेत. त्यामुळे थेरगाव आणि परिसरात भाजपाला खिंडार पडणार, अशी स्थिती निर्माण झाली होती. मात्र, आमदार लक्ष्मण जगताप यांनी संतोष बारणे यांचे मोठे बंधू नारायण बारणे यांचा दोन्ही मुलांसह भाजपामध्ये प्रवेश घडवून आणला.  त्यामुळे संतोष बारणे यांना घरातूनच धक्का बसला असून, भाजपाने राष्ट्रवादीवर जोरदार पलटवार केला आहे, अशी चर्चा थेरगाव परिसरात रंगली आहे. विशेष म्हणजे एकाच घरातले भाऊबंधू आत्ता एकमेकांचे राजकीय शत्रू झाले असल्याचं दिसून येतंय.

२०२२ च्या पिंपरी – चिंचवड महागगरपालिका निविडणुकीत संतोष बारणे आणि नारायण बारणे यांच्यात राजकीय संघर्ष पाहायला मिळेल त्यामुळे या निविडणुकीकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *