मंगलप्रभात लोढा यांच्याकडून एकनाथ शिंदेंच्या बंडाची शिवरायांच्या आग्र्यातील सुटकेशी तुलना
३० नोव्हेंबर २०२२
आज 363 वा शिवप्रताप दिन प्रतापगडावर साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. याचवेळी केलेल्या भाषणात मंगलप्रभात लोढा यांनी शिंदेंच्या बंडाची तुलना शिवरायांच्या अग्र्यातील सुटकेशी केली.
भाजप नेते आणि शिंदे फडणवीस सरकारमधील मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी एकनाथ शिंदे यांच्या बंडाची तुलना छत्रपती शिवरायांच्या अग्र्यातील सुटकेशी केली आहे. औरंगजेबाने शिवरायांना रोखलं, पण शिवाजीराजे त्याच्या हातावर तुरी देऊन निसटले. शिंदेनाही रोखण्याचा प्रयत्न झाला पण शिंदेही महाराष्ट्रासाठी बाहेर पडले, असं मंगलप्रभात लोढा म्हणाले. त्यांच्या वक्तव्यानंतर विरोधी पक्षाने जोरदार आक्षेप नोंदवला असून या प्रकरणावरुन आता नवा वाद होण्याची शक्यता आहे.
मंगलप्रभात लोढा यांच्या वक्तव्यानंतर विरोधी पक्षनेते अजित पवार, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. दुसरीकडे त्याचा वेगळा अर्थ काढू नये, अशी प्रतिक्रिया उदय सामंत यांनी दिली आहे.