दिनांक ६,७ व ८ जानेवारी रोजी पिंपरीत रंगणार १८ वे जागतिक मराठी संमेलन

दि. ०४/०१/२०२३
पिंपरी


पिंपरी : जागतिक मराठी अकादमी आणि डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ६,७, व ८ जानेवारी २०२३ या कालावधीत ‘शोध मराठी मनाचा’ २०२३ हे १८ वे जागतिक मराठी संमेलन आयोजित करण्यात आले आहे. डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ प्रेक्षागृह संत तुकाराम नगर, पिंपरी, पुणे येथे हे तीन दिवसीय संमेलन रंगणार आहे. या संमेलनाचे अध्यक्षस्थान राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य आणि ज्येष्ठ साहित्यिक डॉ.ज्ञानेश्वर मुळे भूषवणार असून, संमेलनाचे स्वागताध्यक्ष डॉ. डी. वाय. पाटील युनिव्हर्सिटीचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील आहेत.

या १८ व्या जागतिक मराठी संमेलनात अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, दुबई, दक्षिण कोरिया, नेदरलँड, मॉरिशस, न्यूझीलंड, या देशांमधील मराठी मान्यवर सहभाग होत असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते उद्घाटन, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, महाराष्ट्र नवनिर्माणसेनेचे अध्यक्ष व्यंगचित्रकार राज ठाकरे, गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत, माजी केंद्रीयमंत्री रमाकांत खलप, राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा सहभाग, अभिनेते व दिग्दर्शक नागराज मंजुळे, सुबोध भावे, प्रवीण तरडे, आकाश ठोसर, सयाजी शिंदे यांच्याशी संवाद, ‘जागतिक मराठी भूषण पुरस्कार’, मुलाखती, परिसंवाद, चित्र- शिल्प, कविसंमेलन असे भरगच्च कार्यक्रम यामध्ये आयोजित करण्यात आले आहे.

या संमेलनाचा उद्घाटन सोहळा शुक्रवार दिनांक ६ जानेवारी २०२३ रोजी सायंकाळी ४:३० वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष पद्मविभूषण खासदार शरद पवार यांच्या हस्ते होणार आहे. कॉँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. यावेळी ज्येष्ठ उद्योजक आणि प्राज इंडस्ट्रीजचे संस्थापक डॉ.प्रमोद चौधरी यांना ‘जागतिक मराठी भूषण पुरस्कार २०२३’ आणि ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशे यांना विवा चॅरिटेबल ट्रस्ट, वसई- ‘जागतिक मराठी गौरव पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. याप्रसंगी भाई जयंत पाटील, हितेंद्र ठाकूर, नागराज मंजुळे, अरुण फिरोदिया, हणमंतराव गायकवाड आणि परदेशातील निमंत्रित प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. सूत्रसंचालन स्नेहल दामले करतील अशी माहिती जागतिक मराठी अकादमीचे अध्यक्ष रामदास फुटाणे यांनी दिली.

अमेरिकेत खासदार झालेले पहिले मराठी व्यक्ती असलेले श्रीनिवास ठाणेदार यांनादेखील संमेलनानंतर जानेवारी महिन्याच्या अखेरीस ‘जागतिक मराठी भूषण पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात येणार आहे.

चित्रपट, नाट्य, कला, साहित्य, कृषी, शिक्षण आणि आरोग्य अशा विविध क्षेत्रांत आपल्या कर्तृत्त्वाचा ठसा उमटविणाऱ्या परदेशातील मराठी व भारतीय मान्यवर हे या संमेलनाचे वैशिष्ट्य आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *