पुस्तकांमुळे समृद्ध जीवन जगण्याचा संस्कार घडतो पद्मश्री गिरीश प्रभुणे

जागतिक पुस्तक दिनानिमित्त श्री नेरकर यांना ग्रंथसेवा पुरस्कार

 

“आयुष्यात अनेक संकटे येतात, अगदी जवळची माणसे दुरावतात, मात्र पुस्तके आयुष्यभर सोबत करतात. पुस्तकांमधूनच समृद्ध जीवन जगण्याचा संस्कार घडतो, त्यासाठी पुस्तकांची मैत्री केली पाहिजे.” असे प्रतिपादन पद्मश्री गिरीश प्रभुणे यांनी केले.
जागतिक पुस्तक दिनाच्या निमित्ताने, कलारंजन प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक नंदकुमार मुरडे, ग्रंथसेवक जगन्नाथ नेरकर, प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्रीकांत चौगुले आदी मान्यवर उपस्थित होते. संत तुकारामनगर येथील सोहम ग्रंथालय व स्पर्धा परीक्षा अभ्यास केंद्राच्या माध्यमातून केलेल्या सेवा कार्याबद्दल नेरकर यांना ग्रंथसेवा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

 


यावेळी बोलताना प्रभुणे पुढे म्हणाले की” पुस्तकांमुळे एकटेपणा जाणवत नाही. वाचनातून मिळालेल्या विचारातून आयुष्य घडते पण त्यासाठी पुस्तकांबरोबर माणसे वाचायला शिकले पाहिजे.”
सत्कारार्थी नेरकर यांनी “अनेक मोठी माणसे ग्रंथांच्या सहवासातून घडली. समाजाच्या उभारणीत ग्रंथालयाचे महत्त्व महत्त्वाचे योगदान आहे.” असे विचार मांडले.
याप्रसंगी श्री मुरडे यांच्या हस्ते गुरुकुलमधील निवडक मुलांना पुस्तके भेट देण्यात आली. त्यावेळी ते म्हणाले “जमेल तसे वाचत रहा. वाचनाने समृद्ध व्हा. पुस्तकातून सकारात्मक ऊर्जा मिळते. त्याची मदत आयुष्याच्या जडणघडणीसाठी होते.” श्रीकांत चौगुले यांनी प्रास्ताविक केले. सतीश अवचार यांनी सूत्रसंचालन केले तर मारुती वाघमारे यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *