शिरूर | महाराष्ट्र शासनाच्या लेक लाडकी योजेनेचा लाभ आता मिळणार, पोस्ट ऑफिस बचत बँक खात्याद्वारे

महाराष्ट्र शासनाच्या लेक लाडकी योजेनेचा लाभ आता मिळणार, पोस्ट ऑफिस बचत बँक खात्याद्वारे
बातमी : विभागीय संपादक रवींद्र खुडे.
शिरूर – दि. १८ मार्च २०२४.
महाराष्ट्र सरकारने मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी योजना राबवण्यास सुरुवात केली आहे. या योजनेच्या माध्यमातून गरीब कुटुंबातील मुलींना लखपती करण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. महाराष्ट्रात 1 एप्रिल 2023 पासून जन्मलेल्या मुलींना ‘लेक लाडकी’ योजनेअंतर्गत 1 लाख 1 हजार रुपये आर्थिक मदत देण्यात येणार आहे.
या योजनेच्या माध्यमातून राज्यात मुलींच्या जन्मास प्रोत्साहन देऊन मुलींचा जन्मदर वाढवणे, मुलींच्या शिक्षणास चालना देणे, मुलींचा मृत्यूदर कमी करणे तसेच बालविवाह रोखणे, कुपोषण कमी करणे, शाळा बाह्यमुलींचे प्रमाण शून्यावर आणण्यासाठी प्रोत्साहित करणे यासाठी मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी’ ही योजना राज्यात सुरु करण्यात आली आहे.
लेक लाडकी या योजनेचा लाभ कोणाला मिळणार ?
– पिवळ्या व केशरी रेशनकार्डधारक कुटुंबात मुलीचा जन्म झाल्यावर 5 हजार रुपये, इयत्ता पहिलीत गेल्यावर 6 हजार रुपये, सहावीत गेल्यावर 7 हजार रुपये, 11 वीत गेल्यावर 8 हजार रुपये, 18 वर्षे पूर्ण झाल्यावर 75 हजार रुपये, अशा रितीने एकूण त्या मुलीस 1 लाख 1 हजार रुपये एवढा लाभ मिळणार आहे.
शासनामार्फ़त थेट लाभार्थी हस्तांतरण (DBT) द्वारे लाभाची रक्कम लाभार्थ्यांना अदा करण्यात येणार आहे. 1 एप्रिल 2023 नंतर कुटुंबात जन्मणाऱ्या 1 अथवा 2 मुलींना त्याच प्रमाणे 1 मुलगा व 1 मुलगी असल्यास मुलीला या योजनेचा लाभ मिळेल. दुसऱ्या प्रसुतीच्या वेळी जुळी अपत्ये जन्माला आल्यास 1 मुलगा किंवा दोन्ही मुलींना या योजनेचा लाभ मिळेल. पहिल्या अपत्याच्या तिसऱ्या हप्त्यासाठी व दुसऱ्या अपत्याच्या दुसऱ्या हप्त्यासाठी अर्ज सादर करताना माता, पित्याने कुटुंब नियोजन प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य राहील.
योजनेचा लाभ पोस्ट ऑफिस मध्ये घेता येणार –
या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणत्याही पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन लाभार्थी बालिका व तिची आई यांच्या नावाने संयुक्त बचत खाते उघडणे अनिवार्य आहे. याबाबतचा तपशील कोणत्याही जवळच्या पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन प्राप्त करता येऊ शकतो.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी –
तुमच्या भागातील अंगणवाडी सेविकेकडे तुम्हाला या योजनेसाठीचा अर्ज करायचा आहे. या अर्जात तुमची वैयक्तिक माहिती, पत्त्याची माहिती, मोबाईल नंबर, अपत्यांची माहिती, पोस्ट ऑफिस बचत बँक खात्याचा तपशील आणि योजनेच्या कोणत्या टप्प्यातील लाभासाठी अर्ज केला ते लिहायचं आहे. तारीख, ठिकाण टाकून सही करायची आहे. अर्ज करून झाला की अंगणवाडी सेविकेकडून पोहोच पावती घ्यायची आहे.
या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे –
लाभार्थीचा जन्माचा दाखला, कुटुंब प्रमुखांच्या उत्पन्नाचा दाखला (वार्षिक उत्पन्न 1 लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे), लाभार्थीचे आधार कार्ड (प्रथम लाभावेळी ही अट शिथिल राहिल), पालकाचे आधार कार्ड पोस्ट ऑफिस बचत बँक पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स, रेशनकार्ड (पिवळे अथवा केशरी रेशन कार्ड साक्षांकित प्रत), मतदान ओळखपत्र, शाळेचा दाखला, कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया प्रमाणपत्र, अंगणवाडी सेविकेकडे योजनेसाठीचा अर्ज व कागदपत्रे नीट तपासून घेतली की त्याची नोंदणी सरकारच्या ऑनलाईन पोर्टलवर करायची आहे. त्यानंतर तो अर्ज संबंधित बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्याकडे द्यायचा आहे. त्यानंतर सदर अर्ज अंतिम मंजुरीसाठी महिला व बालविकास अधिकाऱ्याकडे पाठवायचा आहे.
तरी जास्तीत जास्त लाभार्थी मातांनी जवळच्या पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन संयुक्त बचत खाते उघडून लेक लाडकी योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री बी.पी. एरंडे, अधीक्षक डाकघर, पुणे ग्रामीण विभाग यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *