निशाणा चुकलेल्यांनी भाजपला हिंदुत्व शिकवू नये, सचिन काळभोर यांचा सुलभा उबाळे यांच्यावर पलटवार

पिंपरी : भाजपचे अमोल थोरात यांनी ‘कार्टून’ व्हायरल करून पिंपरी – चिंचवड महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्यावर उपरोधिक टीका केली. त्यावरून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाच्या सुलभा उबाळे यांनी थोरात यांच्यावर टीका केली. हेच भाजपचे हिंदुत्व आहे का, असा प्रश्न उपस्थित केला. त्यानंतर भाजपचे शहर सचिव सचिन काळभोर यांनी उबाळे यांना प्रत्युत्तर दिले आहे. कोणीही भाजपला हिंदुत्व शिकवू नये, असे म्हणत उबाळे याच महापालिका प्रशासनातील खाबुगिरीच्या लाभार्थी आहेत का, असा पलटवार केला आहे.

सचिन काळभोर यांनी याबाबत प्रसिद्धीपत्रकाद्वारे उबाळे यांच्यावर टीका केली आहे. ‘होमहवन’मधून आयुक्त शेखर सिंह यांना सद्बुद्धी लाभू दे, असे म्हणत अमोल थोरात यांनी उपरोधिक टीका केली. तसेच सुविचाराचा उपहासात्मक वापर करून सिंह यांच्यावर नेम साधला. त्याबाबत कार्टून व्हायरल करून थोरात यांनी आयुक्त सिंह यांच्याकडून चुकीचे निर्णय झाल्याचे भाष्य केले. मात्र, उबाळे यांना ही बाब समजून आल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे त्यांनी टीका केली. मात्र, त्यांच्या टिकास्त्राचा निशाणा चुकला आहे.

टीडीआर घोटाळ्याप्रकरणी महापालिका आयुक्त सिंह यांच्यावर आरोप होत आहेत. तसेच इतर प्रकल्पात देखील गैरव्यवहार झाल्याचे सांगण्यात येत आहे. असे असताना या चुकीच्या गोष्टींसाठी महापालिका आयुक्त सिंह यांची पाठराखण करण्यासाठी उबाळे यांचा खटाटोप सुरू आहे.

महापालिका प्रशासनातील गैरव्यवहार आणि टीडीआर घोटाळ्याचे काही जण ‘लाभार्थी’ आहेत. त्यांच्याकडून अशी पाठराखण केली जाते. सुलभा उबाळे देखील ‘लाभार्थी’ आहेत का, असा प्रश्न उपस्थित होतो. महापालिका प्रशासनाच्या चांगल्या कामाचे कौतुक आहेच. मात्र, चुकीच्या गोष्टी निदर्शनास आणून देणे देखील आवश्यक आहे. मात्र, निशाणा चुकलेल्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या सुलभा उबाळे यांना ही बाब समजून येणार नाही, अशी टीका सचिन काळभोर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *