भोसरी ते आळेफाटा व भोसरी ते ओझर मार्गावर PMPML बस सेवा सुरू करा – आमदार अतुल बेनके

रामदास सांगळे
विभागीय संपादक,जुन्नर
२३ फेब्रुवारी २०२२

बेल्हे


पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या माध्यमातून भोसरी ते नारायणगाव मार्गे ओझर आणि भोसरी ते आळेफाटा या दोन मार्गावर बस सेवा सुरु करण्याची मागणी पीएमपीएमएलचे व्यवस्थापकीय संचालक लक्ष्मी नारायण मिश्रा यांच्याकडे आमदार अतुल बेनके यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

आमदार अतुल बेनके यांनी दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, अष्टविनायकापैकी एक असलेल्या ओझर या ठिकाणी राज्यासह पुणे, पिंपरी चिंचवड या ठिकाणावरून तसेच खेड, मंचर, नारायणगाव, चाकण या औद्योगिक भागातून मोठ्या प्रमाणावर भाविक भक्त दर्शनासाठी येत असतात. जुन्नर तालुका राज्य सरकारने पर्यटन तालुका म्हणून जाहीर केलेला आहे त्या अनुषंगाने गणेश भक्त व पर्यटक मोठ्या प्रमाणावर अष्टविनायक ओझर या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात. सदर दोन्ही मार्गावर बससेवा सुरू केल्यास धनगरवाडी, कैलासनगर, येडगाव, ओझर, हिवरे बुद्रुक तसेच पिंपळवंडी, आळे, वडगाव आनंद, वडगाव कांदळी या गावांमधील हजारो नागरिक, नोकरदार वर्ग, विद्यार्थी वर्गाला याचा फायदा होणार आहे.

गणेश भक्त, सामान्य नागरिक, विद्यार्थी व नोकरदार कर्मचारी वर्ग यांचा विचार करता भोसरी ते नारायणगाव मार्गे ओझर आणि भोसरी ते आळेफाटा या दोन मार्गावर नवीन बससेवा सुरू करणेबाबत कार्यवाही करण्याची मागणी आमदार अतुल बेनके यांनी केली आहे. याआधी भोसरी ते जुन्नर मार्गावर बस सुरू करण्यात आली आहे व या बस सेवेला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *