प्रियांका जगताप यांचे २६ जानेवारी चे आत्मदहन आंदोलन तात्पुरते स्थगित…

प्रियांका जगताप यांचे २६ जानेवारी चे आत्मदहन आंदोलन तात्पुरते स्थगित
बातमी : विभागीय संपादक रवींद्र खुडे.
शिरूर : दि. २५/०१/२०२४.
शिरूर तालुक्यातील ढोकसांगवी गावच्या ग्राम पंचायत सदस्या प्रियांका जगताप यांनी, ढोकसांगवी ग्राम पंचायत मध्ये सन २०१३ – १४ मध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत, त्यांच्या जवळील पुरव्यांनीशी, पंचायत समिती व जिल्हा परिषदेला तक्रार दाखल केली होती. त्यानुसार पंचायत समितीने चौकशी समिती नेमून तिचा अहवाल २०१५ साली जिल्हा परिषदेला पाठविलेला होता. परंतु त्यानंतर २०१९ सालापर्यंत यावर पाठपुरावा न झाल्याने व कोणतीच कार्यवाही न झाल्याने, २०१९ ला पुन्हा जगताप यांनी या प्रकरणाचा पाठपुरावा सुरू केला.
ग्राम पंचायतवर केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपाबाबत आर्थिक व्यवहारांबाबत अनियमितता असल्याचे सिद्ध झाल्याने, तत्कालीन ग्रामसेविका यांची खातेनिहाय चौकशी होऊन त्यांच्यावर अनियमिततेचा ठपका ठेवण्यात आला होता. परंतु या कारवाईने समाधान न झाल्याने जगताप यांनी विभागीय आयुक्त यांच्याकडे तत्कालीन सरपंच व अन्य दोषींवर कारवाई करण्याची लेखी मागणी केली होती.
परंतु त्या कारवाईस टाळाटाळ व दिरंगाई होत असल्याचे प्रियांका जगताप यांचे म्हणणे असल्याने, त्यांनी दोन दिवसांपूर्वी शिरूर येथे पत्रकार परिषद घेत, २६ जानेवारी २०२४ रोजी शिरूर पंचायत समिती येथे आत्मदहन करणार असल्याचा इशारा देत तसे पत्र दिले होते.
त्यावर पंचायत समिती शिरूर यांनी त्यांना २४ जानेवारी रोजी आत्मदहन न करण्याचे आवाहन करत, आत्मदहनापासुन परावृत्त करण्याचा प्रयत्न करत, ग्राम विस्ताराधिकारी राम राठोड व बी आर गावडे यांच्या शिष्टमंडळासह पंचायत समिती येथे बैठक घेतली होती. यावेळी ढोक सांगवी ग्रामस्थ व पत्रकारही उपस्थित होते. परंतु त्यावेळी गटविकास अधिकारी महेश डोके हे पुणे येथे कार्यालयीन कामकाजासाठी असल्याने, या बैठकीत ठोस निर्णय होऊ शकला नव्हता. त्यामुळे पुन्हा २५ जानेवारी २०२४ रोजी शिरूर पंचायत समिती कार्यालयात गटविकास अधिकारी यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. यावेळी तक्रारदार व ग्राम पंचायत सदस्या तथा भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोशच्या महीला तालुकाध्यक्षा प्रियांका जगताप, यांच्यासह भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोशचे पच्छिम महाराष्ट्र अध्यक्ष काशिनाथ आबा पाचंगे, ग्राम विस्ताराधिकारी राम राठोड व बी आर गावडे तसेच पत्रकार बांधव उपस्थित होते.
यावेळी या विषयावर सविस्तर चर्चा होऊन, जिल्हा परिषद, विभागीय आयुक्त यांनी संबंधित कर्मचाऱ्यांवर केलेल्या कारवाई संदर्भात माहिती देत, विभागीय आयुक्तांकडे या संबंधाची आणखी चौकशी सुरू असल्याचे व ती चौकशी अंतिम टप्प्यात असल्याचे सांगितले.
परंतु जगताप यांच्या म्हणण्यानुसार, “केवळ शासकीय कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी नसून तत्कालीन सरपंच व अन्य दोषींवरही कारवाई होणे आवश्यक असल्याची ठाम भूमिका जगताप यांनी घेतल्याने, गटविकास अधिकारी यांनी उपायुक्त कार्यालयाशी संपर्क साधत व एक महिन्यांत कार्यवाही पूर्ण होण्याचे आश्वासन जगताप यांना लेखी पत्राद्वारे दिल्याने, प्रियांका जगताप यांनीही एक महिनाभर आत्मदहन न करण्याचे लेखी पत्र गटविकास अधिकाऱ्यांना दिलेय. त्यामुळे २६ जानेवारी २०२४ रोजी ऐन प्रजासत्ताक दिनी पंचायत समिती समोर जगताप यांनी दिलेल्या आत्मदहनाच्या इशाऱ्याला सध्या तरी स्थगिती मिळाल्याने सर्वांनीच सुटकेचा निःश्वास टाकलेला दिसत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *