प्रजासत्ताक दिनानिमित्त महानगरपालिकेच्या मुख्यालयात सकाळी ८ वाजता ध्वजारोहणाचा मुख्य सोहळा

भारताच्या ७५ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त शुक्रवार दि.२६ जानेवारी २०२४ रोजी सकाळी ८ वाजता पिंपरी चिंचवड महापालिकेच्यावतीने पिंपरी येथील महापालिका मुख्यालयाच्या प्रांगणात आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा शासकीय समारंभ संपन्न होणार आहे.

ध्वजारोहण समारंभापुर्वी सकाळी ७ वाजून ५० मिनिटांनी भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामुहिक वाचन करण्यात येणार आहे. यावेळी महापालिका सुरक्षा रक्षक दल, अग्निशमन दल, पोलीस, महाराष्ट्र सुरक्षा रक्षक मंडळाचे जवान ध्वजसंचालन करणार आहेत. या सोहळ्यासाठी खासदार सुप्रिया सुळे, श्रीरंग बारणे, डॉ. अमोल कोल्हे, आमदार उमा खापरे, संग्राम थोपटे, अण्णा बनसोडे, महेश लांड़गे, अश्विनी जगताप यांच्यासह सर्व माजी महापौर, माजी खासदार आमदार, माजी नगरसदस्य तसेच शहरातील मान्यवरांना निमंत्रित करण्यात आले आहे. प्रजासत्ताक दिनाच्या या समारंभाला महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित असतील. शहरवासियांनी या कार्यक्रमाला उपस्थित रहावे, असे आवाहन अतिरिक्त आयुक्त प्रदिप जांभळे पाटील, विजयकुमार खोराटे, उल्हास जगताप यांनी केले आहे.

अधिकाधिक नागरिकांना हा सोहळा घरबसल्या पाहता यावा, यासाठी महापालिकेच्या अधिकृत फेसबुक पेज तसेच यु टयूब चॅनेलद्वारे सोहळ्याचे थेट प्रक्षेपण केले जाणार आहे.
या दिवशी महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीवर तसेच सर्व क्षेत्रीय कार्यालयांच्या इमारतींवर विद्युत रोषणाई करण्यात येईल.

महापालिकेच्या सर्व आठ क्षेत्रीय कार्यालयांमध्ये क्षेत्रीय अधिकारी, महापालिका शाळांमध्ये मुख्याध्यापक, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये प्राचार्य तर विभागीय कार्यालयांमध्ये शाखाप्रमुखांच्या हस्ते सकाळी ७ वाजून ३० मिनिटांनी ध्वजारोहण समारंभ संपन्न होणार आहे. तत्पूर्वी याठिकाणी भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामुहिक वाचन केले जाईल.

शालेयस्तरावर वक्तृत्व स्पर्धा, प्रश्नमंजूषा/देशभक्तीपर निबंध व गीत स्पर्धांचे आयोजन केले जाणार असुन प्रभात फेऱ्या काढण्यात येणार आहेत. तसेच भक्ती शक्ती, निगडी येथे सकाळी १० वाजता देशभक्तीपर गीतांचा सांस्कृतिक कार्यक्रम सादर होणार आहे. यामध्ये नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन महापालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *